राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे ; पुणे पीपल्स बँकेच्या अमृतमहोत्सवानिमित्त बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : बँकेचे मूल्यांकन करताना ते केवळ आकडेवारीत करणे योग्य नाही. सहकारात बँकेचे मूल्यांकन हे सामाजिक कामात देखील करायला हवे. सुरुवातीला पुणे पीपल्स बँकेची ओळख ही रिक्षावाल्यांची बँक अशी होती. आजही बँकेच्या विविध कार्यातून सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट होत आहे, असे मत राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे यांनी व्यक्त केले.
पुणे पीपल्स को-आॅप बँक लि., पुणे अमृतमहोत्सवी वर्षात (७५) पदार्पण करीत असून त्यानिमित्ताने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित विशेष कार्यक्रमात अमृतमहोत्सवानिमित्त बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.पराग काळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी हे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक संजय कुमार, ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे, सहकारी संस्था पुणे चे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांसह बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड, उपाध्यक्ष बिपीनकुमार शहा, व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष अॅड.सुभाष मोहिते, संचालक सीए जनार्दन रणदिवे, बबनराव भेगडे, सुभाष नडे, डॉ. रमेश सोनवणे, सुभाष गांधी, मिलिंद वाणी, वैशाली छाजेड, निशा करपे, संजीव असवले, डॉ.विश्वनाथ जाधव, स्वीकृत तज्ञ संचालिका श्वेता ढमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोंडवे, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य सीए अजिंक्य रणदिवे, कौस्तुभ भेगडे, उदय जग्ताप, राजेंद्र गांगर्डे, अरुण डहाके आदी उपस्थित होते.
मनोरुग्ण महिलांसाठी अजोड कार्य करणा-या माऊली सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगरचे संस्थापक डॉ.राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांना पुणे पीपल्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुपये १ लाख १ हजाराचा धनादेश, पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. यंदा बँक अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना उपस्थितांसाठी खास मनोरंजनपर संकर्षण व्हाया स्पृहा या विशेष कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
डॉ. पराग काळकर म्हणाले, जीवनात जे जे मिळेल ते समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. डॉ. धामणे दांपत्याने हे प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहे. बँकेने त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. सहकार चळवळीने समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास साधला पाहिजे, हे देखील पुणे पीपल्स बँकेने करून दाखवले आहे.
डॉ. राजेंद्र धामणे म्हणाले, संस्थेचा विश्वस्त असणे म्हणजे ‘ते माझे नाही’ हे समजून काम करणे होय. सहकार क्षेत्रात ही भावना महत्त्वाची आहे. सामाजिक कार्य हे मानवतावादी दृष्टिकोनातून व्हायला हवे. सामाजिक व्रतस्थतेचा आमचा यज्ञ सुरु असून पुरस्कारामुळे याची जबाबदारी अधिक वाढते.
श्रीधर गायकवाड म्हणाले, वसंतपंचमीच्या दिवशी सन १९५२ साली बँकेची स्थापना झाली. ही केवळ बँक न राहता समाजसेवेचे व्रत व्हावे, जनसामान्यांचा तो एक विश्वस्त न्यास असावा या भूमिकेतून बँक सुरु झाली. तसेच आज अखंड ७४ वर्षे व्रतस्थपणे खातेदारांच्या सेवेत कार्यरत आहे. आज संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली गेल्या १७ वर्षात एकूण व्यवसाय ४०० कोटीवरुन रु.२७५० कोटी इतकी प्रगती केली आहे. ०% एनपीए, सभासदांना १२ ते १५ टक्के दराने लाभांश ही बँकेची वैशिष्टे आहेत. यंदा बँक अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. मार्च २०२६ अखेर किमान ५०० कोटी व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर आगामी २/३ वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय रु.५००० कोटी करण्याचा संकल्प आहे. छोट्या बँकांना देखील आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्याकरिता आम्ही लक्ष देत आहोत.
व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष अॅड.सुभाष मोहिते म्हणाले, छोटे उद्योजक, छोटे व्यापारी व ठेवीदार यांना हक्काचे ठिकाण वाटावे, आधार वाटावा, याकरीता ३१ जानेवारी १९५२, वसंत पंचमी च्या दिवशी पुणे पीपल्स बँकेची स्थापना झाली. आजपर्यंत स्वत:च्या मालकीचे बँकेचे मुख्य कार्यालय नव्हते, आता या संचालक मंडळाच्या प्रयत्नातून अमृतमहोत्सवी वर्षात स्वत:च्या मालकीच्या वास्तूत मुख्य कार्यालय स्थलांतरीत होणार आहे. हे मुख्य कार्यालय तब्बल २६ हजार चौरस फूटांच्या वास्तूत असणार आहे. लवकरच बँकेला डायरेक्ट मेंबरशीप व शेडयुल्ड दर्जा मिळविण्यात आम्ही यशस्वी होऊ. विश्वस्त भावनेने संचालक मंडळाचे काम सुरू असून तळागाळातील माणसासाठी कामाचा संकल्प आहे. सहकारी बँक विश्वासावर चालते हे जाणून आम्ही याप्रमाणे बंधने घालून काम करीत आहोत. आज बँकेचे २७ हजार २७६ सभासद असून लाखाच्या पुढे खातेदार आहेत. हा विस्तार यापुढेही विश्वासाने होत राहील, असेही त्यांनी सांगितले.

