गायक अमोल पटवर्धन आणि विदुषी डॉ. धनश्री लेले यांच्या गायन आणि प्रवचनात सर्वच तल्लीन
मानसी उपक्रमाचा त्रैमासिक सस्नेह मेळावा उत्साहात साजरा
पुणे- स्त्रीच कुटुंबाला आणि समाजाला योग्य दिशा दाखवू शकते, असे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. तसेच, मानसी उपक्रम हा स्त्रीला शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या सदृढ करण्यासाठी सुरु केल्याचे ना. पाटील यांनी यावेळी नमूद केले.नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मध्ये सुरु असलेल्या मानसी उपक्रमाचा त्रैमासिक सस्नेह मेळावा आज संपन्न झाला. यावेळी मानसी उपक्रमाच्या संचालिका मुग्धा भागवत, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मनिषा बुटाला, ॲड. मिताली सावळेकर, उद्योजिका स्मिता पाटील, प्रा. डॉ. अनुराधा एडके, ॲड. प्राची बगाटे यांच्यासह मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणाला नेहमीच प्राथमिकता दिली आहे. कारण, स्त्रीच कुटुंबाला समाजाला दिशा देऊ शकते. मुलांवर योग्य प्रकारचे संस्कार करुन चांगली पीढि घडवू शकते. त्यामुळे तिला तिची वाढ होत असताना अवश्यक सर्व गोष्टी वेळीच पुरवल्या, तर संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी योगदान देण्यासाठी सक्षम होऊ शकते. मानसी उपक्रम त्याच हेतूने सुरु असून, यातून प्रत्येकामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा आणि ती प्रवाहित करण्याचा प्रयत्न आहे.
ते पुढे म्हणाले की, आज प्रत्येक घरात मोबाईलचा अतिरेकी वापर सुरु आहे. त्यामुळे संवाद कमी झाला आहे. त्यामुळे दिवसातून किमान २० मिनिटे तरी घरातल्यांनी मोबाईल बाजूला ठेवून, संवाद साधला पाहिजे. लहान मुलांचे गोष्टींच्या माध्यमातून प्रबोधन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.
दरम्यान, या त्रैमासिक सस्नेह मेळाव्यानिमित्त सुप्रसिद्ध गायक अमोल पटवर्धन यांच्या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले, तर विदुषी डॉ. धनश्री लेले यांच्या सुश्राव्य व प्रेरणादायी प्रवचनाने उपस्थितांना सकारात्मक विचारांची दिशा दिली.

