अखिल भारतीय महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्र प्रभारी शिल्पी अरोरा
पुणे –
महाराष्ट्रात मागील काही काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बलात्कार, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यांनंतरही आरोपींवर कडक कारवाई होत नसल्यामुळे राज्यातील महिला सुरक्षेची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी तीव्र टीका अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्र प्रभारी शिल्पी अरोरा यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची विस्तारित कार्यकारिणी बैठक पुण्यातील काँग्रेस भवन येथे पार पडली. या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, काँग्रेस पक्षाचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, महिला सचिव अर्चना शाह भिवरे पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला कमिटी सरचिटणीस उज्वला साळवे,मोनिका जगताप, शिल्पा ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, उपाध्यक्ष अनिता मकवाणी, ग्रामीण अध्यक्षा सायली नढे, विविध ब्लॉक, प्रभाग व वॉर्ड अध्यक्षांसह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
शिल्पी अरोरा म्हणाल्या की, “राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत बेफिकीर आहे. केवळ घोषणा केल्या जात आहेत, प्रत्यक्षात महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे महिला काँग्रेसने आता महिलांच्या स्वसंरक्षणासाठी विशेष कार्यक्रम हाती घ्यावेत. सरकारवर अवलंबून न राहता महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याची गरज आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात फेब्रुवारी अखेरपर्यंत ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण केल्या जातील. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बाजूला करून सक्रिय व काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. ओळख किंवा नातेसंबंधांच्या आधारे नियुक्त्या होणार नाहीत. प्रत्येक जिल्हाध्यक्ष व ब्लॉक अध्यक्षांनी दर महिन्याला बैठक घेणे बंधनकारक राहील.
या बैठकीत नवनिर्वाचित नगरसेविका अश्विनी लांडगे, सायरा शेख आणि दिपाली ढोक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच काँग्रेसच्या माजी सातारा महिला जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक यांनी भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे म्हणाल्या की, महिलांचा खरा सन्मान काँग्रेस पक्षातच होतो. भाजपमध्ये महिलांना केवळ मतांसाठी वापरले जाते. महाराष्ट्रात महिला अत्याचार वाढत असताना सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. सुरक्षित महिला वातावरण निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष हाच एकमेव पर्याय आहे.
पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी मनपा निवडणुकीत महिला कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन केलेल्या कामाचा उल्लेख करत, महिलांच्या सहभागातून पक्ष संघटना अधिक मजबूत केली जाईल, असे सांगितले.
वाढत्या महिला अत्याचारावर उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी
Date:

