पुणे -पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या काही समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 12 वाजता टिळक रस्त्यावरील डी.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल येथे घडली.
याप्रकरणी कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता सुधीर पांडुरंग आलुरकर (वय 52, रा. पिंपळे गुरव) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रूपाली ठोंबरे यांच्यासह इतर काही उमेदवार व त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी सुरू असताना ठोंबरे यांनी त्यांच्या हरकत अर्जाची पोहोच देण्याची मागणी करत मतमोजणी केंद्रात उभारलेल्या सुरक्षा जाळीवर चढून जोरदार घोषणाबाजी व आरडाओरड केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर उमेदवार व प्रतिनिधींनीही गोंधळ घालत निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. सुरक्षेसाठी उभारलेल्या व्यवस्थेचा भंग करून मतमोजणी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

