पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेद्वारे भरण्यासाठी जाहिरात क्र. १/१५७९ प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची दिनांक २५/०१/२०२६ रोजी आयोजित केलेली परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे उपायुक्त प्रशासन यांनी कळविले आहे.
त्यांनी असे म्हटले आहे की,सदर भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुव्यवस्था व उमेदवारांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध बाबींचा आढावा घेण्यात येत आहे. सदर परीक्षेची नवीन तारीख, वेळ व परीक्षा केंद्रांची माहिती लवकरच निश्चित करून अधिकृत संकेतस्थळ तसेच प्रसारमाध्यमाद्वारे उमेदवारांना कळविण्यात येईल.
उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, अपप्रचार किंवा अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे. तसेच प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. उमेदवारांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, भरती प्रक्रिया अधिक सक्षम, सुव्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने राबविण्याची ग्वाही दिली आहे.
सदर परीक्षेबाबत पुढील कार्यवाही किंवा नव्याने निश्चित होणारा परीक्षेचा दिनांक संदर्भातील माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.pmc.gov.in/mr/b/recruitment व https://www.pmc.gov.in/en/b/recruitment प्रसिद्ध करण्यात येईल.

