पुणे, दि. २३ : महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण व्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर विचारमंथन करण्यासाठी आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमास उच्च शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, राज्य प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक व शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. मंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फ्लिबनेट केंद्र, गांधीनगर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी इन्फ्लिबनेटच्या संचालिका प्रा. डॉ. देविका मदल्ली उपस्थित होत्या.
या सामंजस्य कराराअंतर्गत राज्य संस्थात्मक क्रमवारी प्रणाली आणि राज्य उच्च शिक्षण माहिती व्यवस्थापन प्रणाली या एकात्मिक वेब-आधारित प्रणालींची रचना व विकास करण्यात येणार असून, यामुळे उच्च शिक्षणातील गुणवत्ता, पारदर्शकता तसेच डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी मानवी भांडवल, अर्थव्यवस्था व उच्च शिक्षणाधारित ज्ञान अर्थव्यवस्था या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेतील मुद्द्यांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सुकाणू समितीमार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीचा आढावा सादर केला. तसेच गुणवत्ता व जागतिक मानांकनाच्या अनुषंगाने विद्यापीठांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा सुधारण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड यांनी मार्गदर्शन केले. राज्य संशोधन निधी, महाज्ञानदीप प्रकल्प तसेच पीएम उषा आणि सीएम उषा या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.

