- विद्यापीठ चौकातील डबल डेकर पूल व माण–हिंजवडी मेट्रो प्रकल्पांची महानगर आयुक्तांकडून पाहणी
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सुरू असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील निर्माणाधीन डबल डेकर पूल तसेच माण–हिंजवडी मेट्रो (लाईन–३) प्रकल्पाच्या कामाची पाहणी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी गुरुवारी केली. या पाहणीवेळी पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल)चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सैनी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणेकरांची वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, विद्यापीठ चौकातील डबल डेकर पूल शक्य तितक्या लवकर सार्वजनिक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याचे महानगर आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. डबल डेकर पुलाच्या बाणेर रॅम्पचे काम अतिरिक्त मनुष्यबळ व संसाधनांचा वापर करून वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महानगर आयुक्तांनी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या अधिकारी व अभियंत्यांना दिले. तसेच, पाषाण बाजूकडील रॅम्पच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पाण्याच्या गळतीची समस्या युद्धपातळीवर सोडवण्याच्या सूचना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
दरम्यान, माण–हिंजवडी मेट्रो (लाईन–३) प्रकल्पाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. मेट्रो स्थानकांशी संबंधित तांत्रिक अडचणींवर चर्चा करून त्यावर तातडीच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या. विशेषतः शिवाजीनगर स्टेशन, मोदीबाग आणि विद्यापीठ चौक येथील पादचारी पुलांच्या (फूट ओव्हर ब्रिज) कामाची सद्यस्थिती तपासण्यात आली. मेट्रो मार्गिकेवरील कामाचा दर्जा राखून प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरातील वाहतूक अधिक सुलभ व गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

