बदलापूर- येथे पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली असून, एका नामांकित खासगी शाळेतील चार वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापूर पश्चिम भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे याआधीही बदलापूरमध्ये अशाच प्रकारची घटना घडून शाळा प्रशासनावर टीका झाली होती. यावेळीही सुरुवातीला शाळा प्रशासनाने गंभीरतेने दखल न घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अखेर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी बस चालकाला अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पीडित चिमुकली बदलापूर पश्चिमेतील एका खासगी शाळेत नर्सरीमध्ये शिकत होती. ती नेहमीप्रमाणे शाळेच्या व्हॅनमधून दुपारी घरी परतत होती. मात्र, त्या दिवशी दुपारी 12.30 वाजेपर्यंत मुलगी घरी न पोहोचल्याने तिच्या आईला शंका आली. त्यांनी तात्काळ व्हॅन चालकाला फोन करून विचारणा केली. त्यानंतर दीड तास उशिराने चिमुकली घरी पोहोचली. ती अत्यंत घाबरलेली आणि मानसिक तणावात असल्याचं पालकांच्या लक्षात आलं. आईने विश्वासाने विचारणा केल्यानंतर चिमुकलीने शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाने तिच्या गुप्तांगाला हात लावल्याचं सांगितलं.
मुलीच्या पालकांनी तत्काळ तिला घेऊन शाळेत धाव घेतली. मात्र, यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकेने तक्रारीकडे दुर्लक्ष करत बस चालकाचीच बाजू घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मुख्याध्यापिकेने चालकाला शाळेत बोलावून घेतलं. चालक केबिनमध्ये प्रवेश करताच चिमुकली प्रचंड घाबरली आणि थेट आपल्या आई-वडिलांच्या पाठीमागे लपली. या प्रकारामुळे पालकांचा संशय अधिकच बळावला. शाळेकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने अखेर पालकांनी पोलिस ठाण्याची वाट धरली.
पालकांच्या तक्रारीनंतर बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी व्हॅन चालकाला ताब्यात घेतलं आणि अटक केली. सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2 ते 3 दरम्यान शाळेच्या खासगी व्हॅनमध्ये आरोपीने चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपी अटकेत असून मुलीची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. सदर व्हॅन ही खासगी शाळेची असल्याने शाळा प्रशासनाचीही चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. राज्य सरकारने स्पष्ट निर्देश दिले असतानाही सदर स्कूल व्हॅनमध्ये महिला अटेंडंट नव्हती. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक असलेले नियम शाळेने धुडकावल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता आरोपी चालकासोबतच संबंधित शाळेवरही कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याआधीही बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये शाळा प्रशासनाने पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महिला कार्यकर्त्या बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. प्रकरणाच्या निषेधार्थ वातावरण तापलं. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या संगीता चेंदवणकर यांनी संबंधित स्कूल व्हॅनवर दगडफेक करत तीव्र संताप व्यक्त केला. घटनेनंतर पोलिस ठाण्याच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
या प्रकरणाच्या तपासासाठी मध्यरात्री फॉरेन्सिक पथक बदलापुरात दाखल झालं. फॉरेन्सिक टीमने स्कूल व्हॅनची बारकाईने तपासणी करून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, शाळा प्रशासनावर नेमकी काय कारवाई होते आणि पीडित चिमुकलीला न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बदलापूर पुन्हा एकदा अशा घृणास्पद घटनेमुळे हादरलं असून, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

