मुंबई-राज्यामध्ये राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, हे वाढलेल्या गुन्हेगारीवरुन दिसून येत आहे. याला कारणीभूत सत्ताधारी पक्ष आहे, कारण गुन्हेगारांना स्वीकृत नगरसेवकपद देणं गुन्हेगारांना मनपामध्ये तिकीट देणं यातून समाजामध्ये जो मेसेज चाललेला आहे, की काहीही केले तरी सरकार अभय देते यामुळे धाडस वाढत चालले आहे, असे म्हणत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
सतेज पाटील पुढे बोलताना म्हणाले की, शक्ती कायदा केंद्र सरकारकडे पडून आहे. कायद्यातील त्रुटीचा उपयोग करत आम्हाला काहीही करता येते असे आता लोकांना वाटू लागले आहे. राज्यामध्ये अशा घटनामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे याला सर्वस्वी गृहखाते जबाबदार आहे. कायद्यानुसार शिक्षा होते हा मेसेज समाजामध्ये गेला पाहिजे. अक्षय शिंदेंचा प्रकरणानंतर लोकांनी काहीही बोध घेतलेला दिसून येत नाही. म्हणून कायदा सक्षम करणे आणि गुन्ह्यात आपल्याला कुणीही पाठिशी घालणार नाही हा मेसेज जाणं गरजेचे आहे.
सतेज पाटील म्हणाले की, बदलापूर प्रकरणातील आरोपीला जर भाजप स्वीकृत नगरसेवक करत असेल तर सत्ताधारी पक्षच प्रोत्सहित करत असेल तर अशा लोकांचे धाडस वाढते. गृहमंत्रालयासाठी वेगळा मंत्री असायला हवा. मुख्यमंत्र्यांना या बद्दल सर्व माहिती मिळतच असते गृहमंत्री कोणीही असो. मंत्रिमंडळ प्रमुख म्हणून त्यांना सर्व माहिती जातेच. गृहखाते कोण चालवते हे कळत नाही, चार अधिकारी हे खाते चालवतात हे वास्तव आहे. कायदा-सुव्यवस्था जर टिकवायची असेल तर गृहखात्याला वेगळा मंत्री देणं गरजेचे आहे.
सतेज पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च अधिकार आहेत. ते कुठल्याही अधिकाऱ्याला बोलावून घेऊ शकतात. फडणवीस जर गृहमंत्रालयाला न्याय देत असते वेळ देऊ शकत असते तर आमची काही हरकत नव्हती पण तसे होतांना दिसून येत नाही. राज्याचा विकास व्हावा असे वाटत असेत तर कोणताही उद्योग हा राज्यात कायदा-सुव्यवस्था कशी आहे हे बघणारच.
सतेज पाटील म्हणाले की, लाडक्या बहीणीच्या केवायसीच्या नावाखाली लाखो बहीणींचे अनुदान थांबवण्यात आले आहे. मग गेले वर्षभर हे अनुदान त्यांना कसे मिळत होते. अचानक ते अनुदान कसे बंद करण्यात आले. त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी हे पैसे देणं बंद केले आहे. केवळ निवडणुकीपुरत्या लाडक्या बहीणी आहेत. लाडकी बहीण योजना बंद करू नये. ज्यांचे अनुदान बंद करण्यात आले आहे ते पुन्हा देण्यात यावे अशी आमची भूमिका आहे.

