मुंबई-अक्षय शिंदे प्रकरणाच्या जखमा अद्याप ताज्या असतानाच, बदलापूर शहर पुन्हा एकदा एका घृणास्पद घटनेने हादरले आहे. पश्चिम भागातील एका खासगी शाळेत नर्सरीत शिकणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरडीवर स्कूल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक करत त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅनची तोडफोड करून पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली.
शाळेतून येताना व्हॅनमध्ये मुलगी एकटीच असल्याचे पाहून चालकाने तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीने पालकांना घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली. पण शाळा प्रशासनाने चालकाचीच पाठराखण केली, असा आरोप पालकांनी केला आहे.या प्रकरणातील संताप व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संगीता चेंदवणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. चिमुकल्यांच्या सुरक्षेबाबत वारंवार घडणाऱ्या या गंभीर प्रकारांमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष असून, शहरात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
बदलापूर (पूर्व) येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर (वय ३ व ४ वर्षे) लैंगिक अत्याचाराची घटना आॅगस्ट २०२४ मध्ये घडली होती. या प्रकरणी शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक केली. या दरम्यान, २३ सप्टेंबर २०२४ रोजी तो चकमकीत मारला गेला.

