पुणे- महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या रिक्त असणाऱ्या १६९ जागा भरणेकरिता जाहिरात दिल्यानुसार यापूर्वी दिनांक ०१/१२/२०२५ रोजी परीक्षा आयोजित केलेली होती. तथापि राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकांमुळे त्यादिवशीची सदरची परीक्षा रद्द करण्यात आलेली होती. आता हीच परीक्षा दिनांक २५/०१/२०२६ रोजी आयोजित केलेली आहे.
राज्यातील ६ महसुली विभागातील २० जिल्ह्यांमध्ये एकूण ६९ केंद्रांवर सदरची परीक्षा आयोजित केलेली आहे. या परीक्षेकरिता ४१,२७३ परीक्षार्थी बसलेले आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आयबीपीएस या संस्थेमार्फत सदरची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांबाबत काही परीक्षार्थीकडून हरकती नोंदविण्यात आलेल्या आहेत. मात्र याबाबत आयबीपीएस संस्थेची संलग्न असणाऱ्या परीक्षा केंद्रांवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन परीक्षा आयोजित करण्याबाबत पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयबीपीएस संस्थेस सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यासाठी कार्यकारी अभियंता दर्जाचे प्रत्येकी ०१ अधिकारी जिल्हा निरीक्षक म्हणून नेमण्यात आलेले आहेत. त्यांचे अखत्यारित प्रत्येक परीक्षा केंद्रावर १ उप अभियंता आणि परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थीची संख्या विचारात घेऊन त्यानुसार कनिष्ठ अभियंता असे केंद्र निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत. या प्रकारे सदरची परीक्षा ही अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्याबाबत पुणे महानगरपालिका आणि आयबीपीएस संस्थेच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे.
कोणत्याही परीक्षार्थीनी परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी पडू नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. परीक्षेच्या संदर्भात तसेच नोकरी देण्याबाबत कोणतीही परिचित किंवा अपरिचित व्यक्तीकडून पैसे मागणी करणे, खोटे दावे करणे अशा पद्धतीने प्रलोभन दाखविणायांशी कोणत्याही प्रकारचे आर्थिक देवाणघेवाण परीक्षार्थीनी करू नये, असे आवाहन देखील पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व प्रशिक्षणार्थीना करण्यात येत आहे.
कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 रिक्त जागा भरण्यासाठी २५ जानेवारीला ४१,२७३ उमेदवार देणार परीक्षा
Date:

