पुणे.दि.२२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या (शंभराव्या जयंतीच्या) पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी.बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या कामाबद्दलच्या अनेक आठवणी जागवल्या आणि त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “१९५० ते १९६० या काळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपले विचार मांडले. नंतर १९६० मध्ये ‘मार्मिक’ सुरू केले आणि १९६६ मध्ये शिवसेनेचा जन्म झाला. ‘मार्मिक’मधील ‘वाचा’ आणि ‘थंड बसा’ या सदरांतून मराठी माणसांशी इतर कसे वागतात, याची दखल घेतली जायची. शालेय जीवनातच मी हे अनुभवले, त्यामुळे बाळासाहेबांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा निर्माण झाला.”
त्यांनी पुढे सांगितले, “१९९०-९२ च्या मुंबई दंगलीदरम्यान द्विध्रुवीकरण झाले. एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला भाजप-एनडीए. जॉर्ज फर्नांडिसांसारखे विविध विचारसरणीचे नेतेही एनडीएबरोबर गेले. त्यामुळे माझ्या मनात महाराष्ट्र आणि देशाचा विचार करणाऱ्या नेत्यांच्या बाजूने जावे का, असा विचार आला होता.”
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाविषयी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व. तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, तरी राष्ट्रहिताला प्रथम मानत असाल तर तुम्ही हिंदू आहात, अशी बाळासाहेबांची व्याख्या होती. त्यांनी कधीच जात-धर्म बघून उमेदवारी दिली नाही.”
महिला धोरणावर काम करण्याबाबत बाळासाहेबांनी दिलेल्या प्रोत्साहनाची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, “महिला धोरणावर काम करताना काही अडचण येणार नाही, बिनधास्त करा, असे बाळासाहेब म्हणाले होते. त्यामुळे १९९८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची भेट घालून दिली आणि मी शिवसेनेत प्रवेश केला.”
त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची माहिती देताना सांगितले, “पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख, २००२ मध्ये विधान परिषद आमदार, २००५ मध्ये उपनेता, २००७ मध्ये प्रवक्ता, २००८ ते १०१२ पुणे जिल्हा संपर्क प्रमुख , २०१४ मध्ये विशेष हक्क समिती प्रमुख, लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक यात स्टार प्रचारक म्हणुन १५ वेळा संधी, २०१९ मध्ये चौथ्यांदा आमदारकी आणि विधानपरिषद उपसभापतीपदी नियुक्ती झाली” अशा प्रकारे शिवसेनेची दीर्घकाळ सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
२०१२ मध्ये बाळासाहेबांच्या निधनाबाबत त्या भावुक झाल्या, “तो दिवस अतिशय दुःखद आणि कडेलोट व्हावा असा होता. बाळासाहेब आजारी असतानाही बातम्यांवर लक्ष ठेवून असत आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत. बाळासाहेबांच्या राज्यभरातील सभांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली, प्रत्यक्ष स्टेजवर उपस्थित राहून त्यांना ऐकणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव होता.”
बाळासाहेबांनी महिलांच्या सुरक्षेसाठी लढण्याची प्रेरणा दिल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, “टीका झाली तरी भीती वाटली नाही, कारण शिवसेना आणि तिचे विचार हे आमचे कवचकुंडल आहेत.” त्यामुळे कायमच निर्भीड राहत आलो आहे.
१९९५-९९ मधील युती सरकारवर बाळासाहेबांचे बारीक लक्ष असायचे, चुका झाल्या तर फटकारे यायचे. २०१४ नंतर भाजप-सेनायुती तुटली, त्यानंतरन काही काळाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन केली, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा यशाचा आलेख कायमच चढता राहिला आहे. विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची सदस्यसंख्या वाढली आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शन होत असल्याचे सांगताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची जोरदार कामगिरी सुरू असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

