श्री देवदेवेश्वर संस्थानअंतर्गत सारसबाग सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा
पुणे : माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत असलेल्या सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात गणेशजन्म सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. माघी गणेश जयंती निमित्त श्री सिद्धिविनायक गणपतीला मानाची पेशवाई पगडी परिधान करण्यात आली यासोबतच श्री गणेशाला भरजरी वस्त्र, सोन्याचे दागिने देखील परिधान करण्यात आले होते. मंदिरात करण्यात आलेली रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. सकाळपासूनच सिद्धिविनायक देवतेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, तसेच विश्वस्त सुधीर पंडित, पुष्करसिंह पेशवा, जगन्नाथ लडकत आणि आशिष कुलकर्णी उपस्थित होते.
माघी गणेश जयंतीनिमित्त संस्थान अंतर्गत असलेल्या लक्ष्मीनगर येथील श्री रमणा गणपती मंदिर तसेच पौड फाटा येथील श्री दशभूजा गणपती मंदिर येथेही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत यांच्या हस्ते सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात महापूजा व याग संपन्न झाला. तर श्री दशभूजा गणपती मंदिरात विश्वस्त जगन्नाथ लडकत यांच्या हस्ते आणि श्री रमणा गणपती मंदिरात पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते महापूजा व याग विधी पार पडले.

