ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ; माघ गणेश जन्मोत्सवात विविध कार्यक्रम
पुणे : मोरया, मोरया…. श्री जयति गजानन, कसबा गणपती बाप्पा मोरया… च्या नामघोषाने ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान चा परिसर भक्तीमय झाला. ट्रस्टच्या वतीने मंदिरात माघ गणेश जन्मोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत श्री गणेशजन्म आरती सोहळा थाटात पार पडला. तब्बल सव्वा तास मोरया गोसावी यांनी रचलेल्या विविध आरत्या आणि पदे मंदिरात म्हणण्यात आली.
देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांसह खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार, हर्षद ठकार हे विश्वस्त मंडळ व सर्व ठकार पुजारी यांनी उत्सवाचे आयोजन केले आहे. पुजारी आल्हाद ठकार, ओंकार ठकार, पल्लवी ठकार, आरती ठकार, सीमा ठकार, सुधा ठकार, मधुरा ठकार यांसह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य दैवत श्री जयति गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच काढल्यावर आत अतिशय मनोहरी अशी मूळ स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे. त्यानंतर हा जन्मोत्सव मंदिरात होत असल्याने याला विशेष महत्व आहे.
गणेश जयंतीच्या दिवशी अथर्वशीर्ष पठ्ण व शंखनाद गजर, दुपारी १२.१५ ते १.३० यावेळेत श्री गणेशजन्म आरती सोहळा पार पडला. तर, रात्री ९.३० वाजता शेजारती व छबिना झाला. महिनाभर सुरु असलेल्या गणेशपुराण प्रवचनाची सांगता देखील गणेशजयंतीच्या दिवशी झाली.
दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये दररोज सकाळी ७ वाजता डॉ.पं.प्रमोद गायकवाड आणि शिष्य यांचे सनई चौघडा वादन, सकाळी ९.३० वाजता श्रीं ना अभिषेक, दुपारी ४.३० वाजता महाडकर गुरुजी यांचे गणेशपुराण दररोज पार पडले. पं.शैलेश भागवत यांचे शहनाईवादन, स्वरसंजीवन म्युझिकल प्रस्तुत भावभक्तीरंग हा कार्यक्रम, भज-मन हा भावभक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

