केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांच्याहस्ते महावितरणला पुरस्कार
मुंबई, दि. २२ जानेवारी २०२६: शेतीसाठी वीजपुरवठा करणाऱ्या कृषी वीजवाहिन्यांच्या सौर ऊर्जीकरणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महावितरणचा ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या (AIDA) ‘एडिकॉन-२०२६’ या राष्ट्रीय परिषदेत बुधवारी (दि. २१) पुरस्काराने गौरव करण्यात आला. केंद्रीय ऊर्जामंत्री ना. श्री. मनोहर लाल यांच्याहस्ते महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशातील वीज वितरण क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या (AIDA) ‘एडिकॉन-२०२६’ राष्ट्रीय परिषदेचे नवी दिल्ली येथे दि. २१ व २२ ला आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री ना. श्री. मनोहर लाल यांच्याहस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय ऊर्जा सचिव श्री. पंकज अग्रवाल, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र, सरचिटणीस डॉ. आशिष कुमार गोयल, महासंचालक श्री. आलोक कुमार यांची उपस्थिती होती. या परिषदेत देशभरातील वीज वितरण कंपन्यांचे पदाधिकारी व ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित होते.
आशियातील सर्वांत मोठा विक्रेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० चा ‘एडिकॉन-२०२६’ परिषदेत गौरव करण्यात आला. या योजनेत आतापर्यंत १९८५ कृषीवाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात आले असून राज्यातील तब्बल ८ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. या योजनेमुळे ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७० हजारांवर ग्रामीण रोजगार निर्मिती सुरू आहे. तसेच महावितरणच्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. तब्बल २३१ विकासकांकडून या योजनेमध्ये १६ हजार मेगावॅटचे विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प वेगाने उभारण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

