मनसेने स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी–शिंदे गटाला साथ देणारे शिंदे गटासारखेच
मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेशी युती करण्याच्या मुद्यावरून राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेला खडेबोल सुनावले आहेत. शिंदे गट म्हणजे मराठी माणसांतील एमआयएम, बेईमान व महाराष्ट्रद्रोही आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणारेही याच विशेषणांना पात्र ठरतात, असे ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाशी युती करणाऱ्या मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बुधवारी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाला पाठिंबा देण्याची घोषणा केली. मनसेने महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाशी युती करत शिंदे गटाविरोधात आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर लगेचच मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मनसेवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, आमची भूमिका फार वेगळी व कडवट आहे. ज्यांनी महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरेंशी, मराठी माणसांशी गद्दारी व बेईमानी केली, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची राजकीय व अन्य संबंध ठेवायचे नाहीत.
महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही. सत्ता येते व सत्ता जाते. आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोक नाही. स्वतः राज ठाकरेही नाहीत. त्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. कल्याण डोंबिवलीचा विषय हा समोर आला आहे. तो अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्या मते, हा स्थानिक पातळीवरील निर्णय आहे. असू शकेल. पक्षाच्या मूळ ध्येयधोरणांशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचे स्थानिक म्हणवून घेणारे नेतृत्व विपरित भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने त्याच्याविरोधात कारवाई केली पाहिजे. पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर पक्षातून निलंबित करण्याची कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी अंबरनाथमध्ये भाजपशी असंग केला. त्यानंतर काँग्रेसने तत्काळ त्यांच्यावर पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रतारणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना पक्षातून काढून टाकले. ही एक राजकीय व्यवस्था आहे. फक्त स्थानिक पातळीवर निर्णय झाला म्हणून हा विषय संपत नाही. शिवसेना व मनसे हे एकत्र आहेत. त्यांनी एकत्र निवडणुका लढल्या. अशा वेळी कुणी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन बेडुकउड्या मारत असतील, तर त्या संदर्भात त्यांच्या पक्षाने व नेतृत्वाने त्याच्यावर कारवाई करून महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे की, या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. कारण, राजू पाटील बोलत असताना त्यांच्या पक्षाचे एक नेते उपस्थित होते. हे मी पाहिले. हे लोकांनी माझ्या निदर्शनास आणले.
संजय राऊत पुढे म्हणाले, आत्ता शिंदे गटाचे लोकं म्हणतात, मनसे म्हणजे एमआयएम आहे का? नाही. पण आमच्यासाठी व महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे एमआयएम आहे. मराठी माणसांतील एमआयएम, बेईमान, महाराष्ट्रद्रोही आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात. सत्ता मिळाली नाही, काही मिळाले नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. तुमची काही वैयक्तिक कारणे असू शकतात. पण ती तेवढ्यापुरतीच ठेवायला हवीत. काही लोकांच्या मागे ईडी किंवा इतर तपास यंत्रणा लागल्या असतील. पण तुम्ही त्यासाठी कुणीही पक्ष वेठीस धरणे व महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणे हे पूर्णतः चुकीचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी कल्याण डोंबिवलीतील घटनाक्रमावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशीही चर्चा केली. या चर्चेचा सारांश सांगताना ते म्हणाले, ते पुढे म्हणाले, माझ्यावरही ईडीचे संकट आले. पण मी पक्षाला वेठीस धरले नाही. मी त्या संकटाचा सामना केला. आजही माझी प्रकृती खूप खराब आहे. मी आता ऑपरेशन थिएटरमधून आलो आहे. तर कल्याण डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरेंनी अत्यंत गांभिर्याने घेतला आहे. राज ठाकरेंशी माझी चर्चा झाली आहे. काही मिळाले नाही तरी मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोकं असतात असे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा विषय आहे असे ते म्हणाले. ते खरे आहे. अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत.
मला आत्ताच काहीतरी हवे आहे या मानसिकतेतून मग शहराचा, गावाचा, राज्याचा, देशाचा विकास व उद्या जगाचा विकास या नावाखाली उद्या पक्षांतर वाढतील. महाराष्ट्रात अशा पक्षांतराची कीड वेळीच रोखणे हे न्यायालयाचे काम असले तरी आज देखील सर्वोच्च न्यायालयाने माती खाल्ली आहे. आज पुन्हा पक्षांतराच्या संदर्भात आजची तारीख ठरली असताना सुनावणी पुढे ढकलली. याला माती खाणे म्हणतात आणि देशाच्या ऱ्हासाला हातभार लावणे म्हणतात. सर्वोच्च न्यायालय ते लावत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

