मुंबई-मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सत्ताधारी शिवसेना व भाजपमधील कथित तिढा अजून सुटला नाही. त्यातच शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. तिथे त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे मुंबईतील सत्ता स्थापन करण्याचा तिढा लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक 89 जागांवर विजय झाला आहे. तर शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपला शिंदे गटाच्या मदतीशिवाय मुंबईत आपला महापौर बसवणे अवघड आहे. त्यामुळे शिंदे गटाने आपले उपद्रवमूल्य दाखवत भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. यामुळे निकाल लागू 5 दिवस लोटले तरी मुंबईला अद्याप आपला महापौर मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर पोहोचलेत.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम व शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे सध्या दिल्लीत आहेत. हे दोन्ही नेते मुंबईच्या महापौर पदावर तोडगा काढण्यासाठी सातत्याने चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. तिथे त्यांनी भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची भेट घेऊन महापौर व इतर समित्यांवर चर्चा केली. त्यांचा हा दौरा अत्यंत गुप्त होता. त्यांनी कुणालाही या दौऱ्याची कल्पना दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावरील मुंबईतील सत्ता स्थापनेच्या तिढ्यावर बरेच काही घडल्याचा दावा केला जात आहे.
विशेषतः एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे शिंदे गट मुंबई महापालिकेतील सत्तेच्या वाट्यावरील आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम असल्याचेही संकेत मिळत आहेत. दिल्लीतील चर्चेत केवळ मुंबईच्या महापौर पदावरच नव्हे तर इतर महापालिकांमधील सत्तेच्या वाटपावरही खलबते झाल्याची माहिती आहे. यात ठाणे, कल्याण – डोंबिवली आदी महापालिकांचा समावेश असल्याची माहिती आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे शिंदे गटाने मुंबईतील आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 3 दिवस ठेवले होते. संभाव्य फोडाफोडीच्या राजकारणामुळे त्यांनी शिंदे गटाने हे पाऊल उचलले होते. पण मंगळवारी अखेर पक्षाने आपल्या नगरसेवकांचे विजयाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व इतर दस्तऐवजांच्या मूळ प्रती स्वतःच्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे या नगरसेवकांना आपल्या घर व मतदारसंघाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली.

