पुणे -२४ तास पाणी पुरवठ्याचे गेली १२ वर्षे स्वप्ने दाखविणाऱ्या महापालिका भवनात आता रोज पार्किंग मध्येच ‘टँकर’ दिसणार असल्याचे सांगितले जाते आहे. महापालिकेत असलेली प्रचंड मोठी पार्किंग व्यवस्था अपुरी पडत असताना यात आता रोज एका टँकर ची भर पडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता हा टँकर लावायला जागा महापालिका कुठे उपलब्ध करून देणार हे पाहण्याची उत्सुकता देखील आहेच.त्याचे असे झालेय,एका नगरसेवकाने जोपर्यंत माझ्या भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागतेय तोपर्यंत मी रोज महापालिकेत टँकर नेच येणार असल्याच घोषणा केली आहे.
नऱ्हेगाव परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक कुटुंबांना पैसे देऊन टँकरने पाणी खरेदी करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगरसेवक हरिदास चरवड यांनी ठाम भूमिका जाहीर केली आहे.“जोपर्यंत नऱ्हेगावचा पाण्याचा टँकर बंद होत नाही, म्हणजेच पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत मी पुणे महानगरपालिकेत स्वतःच्या गाडीने जाणार नाही; मी पाण्याचा टँकर घेऊनच महापालिकेत जाणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महापालिकेच्या वतीने नऱ्हेगावासाठी अधिक क्षमतेचा व नियमित पाणीपुरवठा तातडीने उपलब्ध करून द्यावा, नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलनात्मक भूमिका सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नऱ्हे ग्रामस्थांच्या वतीने सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका जयश्रीताई भूमकर, नगरसेविका कोमलताई नवले तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

