पुणे महानगराच्या नियोजनाला ‘हायटेक’ स्पर्श; ‘पीएमआरडीए’ प्रशासनात ‘ब्लॉकचेन’ आणि ‘जीआयएस’ प्रणालीचा यशस्वी वापर!
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरी सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तत्पर करण्यासाठी २९ सेवा पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता राहिलेली नाही. शहरी नियोजन अधिक अचूक व प्रभावी करण्यासाठी ‘जीआयएस पोर्टल’ सुरू करण्यात आले असून, उपग्रह प्रतिमा व प्रगत जीआयएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास आराखडा, पूररेषा, जागांची सद्यस्थिती तसेच विविध विभागांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान व शास्त्रीय झाली आहे. ब्लॉकचेन प्रणालीमुळे माहिती सुरक्षित, अपरिवर्तनीय ठेवली जात असून, पारदर्शकता वाढली आहे आणि माहितीची पडताळणी सुलभ झाली आहे.
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमआरडीएने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासन लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेळेत सेवा देणारे बनवले आहे. या उपक्रमांमुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचला असून, अनावश्यक कार्यालयीन फेऱ्यांना आळा बसला आहे.
टीडीआर ब्लॉकचेन प्रणाली : पीएमआरडीएने टीडीआर नोंदी सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लॉकचेन प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली बनावट कागदपत्रे व फसवणूक रोखण्यास मदत करते. सर्व नोंदी पारदर्शक, अपरिवर्तनीय आणि सुरक्षित स्वरूपात उपलब्ध आहेत.
TDR Blockchain: https://tdr-main.pmrda.gov.in
सुविधा भूखंड ब्लॉकचेन : ॲमेनिटी प्लॉट्सच्या निर्मिती, विक्री व विकास प्रक्रियेत ब्लॉकचेन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना जमिनीच्या वास्तविक मालकीचा तपशील, सार्वजनिक सुविधांचा अंतिम विकास तसेच लिलाव करण्यात आलेल्या जमिनीशी संबंधित संपूर्ण माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होते. ‘आरटीआय’शिवायही माहिती पडताळता येत असल्याने प्रशासनावरील विश्वास वाढला आहे.
Amenity Plot Development Blockchain: https://amenity-main.pmrda.gov.in
जीआयएस पोर्टल : महानगराचे नियोजन अधिक अचूक व परिणामकारक करण्यासाठी जीआयएस पोर्टल विकसित करण्यात आले आहे. हे पोर्टल प्रगत जीआयएस तंत्रज्ञान व उपग्रह प्रतिमांवर आधारित असून, विकास आराखडा, पूररेषा, जागांची सद्यस्थिती तसेच विविध विभागांची माहिती एकत्रित करते. नागरिकांना जमीन, सार्वजनिक सुविधा, नैसर्गिक आपत्तींचे धोके आणि विकास प्रकल्पांबाबत माहिती सहज उपलब्ध होते.
GIS Portal: https://gis.pmrda.gov.in/
पीएमआरडीए आरटीएस पोर्टल : झोन दाखला, भाग नकाशा, बांधकाम परवाने आदींसह जमीन व मालमत्ता, अग्निशमन तसेच विकास परवानगी विभागाशी संबंधित दाखले, यांसारख्या महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे सेवा वितरण अधिक पारदर्शक व गतिमान झाले आहे.
RTS Portal: https://rts.pmrda.gov.in
डिजिटल तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध वापर करून पीएमआरडीएने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर लक्षणीयरीत्या कमी केले आहे. ‘घरबसल्या सेवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वीपणे राबवण्यात आल्याबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

