- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार; सामंजस्य करारानंतर वर्षभरात उद्योग उभारणीचे दावोस येथे कौतुक
दावोस (स्वित्झर्लंड): “जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची ‘अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे उद्योजक भरत गीते यांनी अवघ्या एका वर्षात यशस्वी अंमलबजावणी करून प्रत्यक्ष उत्पादन सुरू केले आहे. वर्षभरात उद्योग उभारणी करणाऱ्या गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि भरत गीते यांच्यातील संवादावेळी ते बोलत होते. या भेटीदरम्यान उद्योग उभारणीतील नियोजन, वेगवान अंमलबजावणी, प्रशासन आणि उद्योजकांमधील समन्वय तसेच उत्पादन क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील वाढते महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या केंद्र सरकारच्या उपक्रमांना बळ देणाऱ्या या उपक्रमांतून कमी कालावधीत उद्योग उभारणी शक्य असल्याचा प्रेरणादायी संदेश देशभरातील उद्योजकांना मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी येथे उभारण्यात आलेल्या ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम कास्टिंग्ज उत्पादन प्रकल्पाने अल्पावधीतच उत्पादन सुरू करत राज्यासमोर आदर्श औद्योगिक मॉडेल उभे केले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, स्थानिक औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे.”
“सामंजस्य करार कागदापुरता न राहता एका वर्षात प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतरित होऊ शकतो, याचे भरत गीते आणि तौरल इंडिया हे उत्तम उदाहरण आहे. मराठी उद्योजकांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता आहे. त्यांना योग्य धोरणात्मक पाठबळ दिल्यास महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नवे शिखर गाठेल,” असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
भरत गीते म्हणाले, “तौरल इंडियाने २०१६ पासून औद्योगिक विस्तार करत ऊर्जा क्षेत्र, संरक्षण उत्पादन, आरोग्य उपकरणे तसेच एरोस्पेस क्षेत्रासाठी आवश्यक अचूक अॅल्युमिनियम कास्टिंग्ज निर्मितीत भरीव योगदान दिले आहे. विविध क्षेत्रांतील या योगदानामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बळ मिळत असून, आर्थिक वाढीस हातभार लागत आहे.
“उत्पादन क्षेत्र हे मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा असून, वाहन उद्योग, अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, संरक्षणपूरक उद्योग, कृषी प्रक्रिया आणि उच्च-मूल्य निर्यातक्षम उत्पादन क्षेत्र मजबूत झाल्यास राज्याचा औद्योगिक पाया अधिक भक्कम होईल,” असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.

