पुणे,: काही नवे, काही जुने दिग्दर्शक एकत्र आले आणि उलगडल्या यावर्षीच्या मराठी चित्रपटांच्या कथा. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज मराठी चित्रपट स्पर्धेतील आदिशेष (रमेश मोरे), तो, ती आणि फुजी (मोहित टाकळकर), तिघी (जिजीविषा काळे), जीव (रविंद्र माणिक जाधव), गोंधळ (संतोष डावखर), गमन (मनोज नाईक साठम) आणि बाप्या (समीर तिवारी) या स्पर्धेतील चित्रपटांच्या दिग्दर्शकांबरोबर आज ‘पिफ‘चे उपसंचालक विशाल शिंदे यांनी संवाद साधला.
‘तिघी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका जिजीविषा काळे म्हणाल्या, “माझा प्रवास ‘वजनदार’ या चित्रपटात सहाय्यक म्हणून सुरू झाला. आता १२ वर्षांनी माझा दिग्दर्शक म्हणून चित्रपट येतोय. पॅशन कितीही जोरदार असली तरी योग्य माणसे बरोबर नसतील तर तुमची गोष्ट पुढे जात नाही. त्यादृष्टीने मी भाग्यवान आहे. मला सतत चांगली माणसे मिळाली. त्यामुळे मी इथपर्यंत आले. पालकांची मी एकुलते एक मुल असल्याने मला सतत एकटे वाटत आले आणि तीच गोष्ट मी माझ्या चित्रपटातून मांडली आहे.” त्या म्हणाल्या, “मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या बायका माझ्या चित्रपटात दिसतील.”
‘तो, ती आणि फुजी’, या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले, “मी पूर्वीपासून नाटक करत होतो पण चित्रपट तयार करण्याचा विचार मनात सतत घोळत होता. त्यातून मग पुढे चित्रपट कण्याचा निर्णय घेतला. मी शहरात वाढलो. मला गोष्टी मिळालेल्या आहेत. मात्र तरीही शहरी कोलाहलात अनेक प्रश्न भेडसावत आहेत. तेच विषय हे माझ्या चित्रपटातून येतात. शहरी जीवनात नात्यांमध्ये बदल घडतात, तेच मी माझ्या आताच्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”
‘जीव’चे दिग्दर्शक रवींद्र माणिक जाधव म्हणाले, “धुळ्यात शिक्षक म्हणून मी काम करतो, मात्र चित्रपट करण्याचा विचार मनात होता आणि त्यातून मी २०१३ रोजी पहिला माहितीपट तयार केला. हॅंडीकॅमवर ‘शाळाबाह्य’, ‘निरोध’ असे माहितीपट तयार केले. माहितीपट तयार केला. चित्रपट कसा तयार करायचा हे काहीच माहीत नव्हते. पुढे ‘थाळ भांकसर’ हा माहितीपट हजारांमध्ये केला आणि त्याला २ लाखाचे बक्षीस मिळाले. मग त्यातून अजून काम करण्याची प्रेरणा मिळाली. लिखाण करत असताना एका माणसाने शाळेमध्ये नागपंचमीची एक आठवण २०१८ मध्ये सांगितली आणि त्यातून ‘ जीव’ चित्रपटाची कथा पुढे आली. बायको आर्थिकदृष्ट्या मागे उभी राहिली आणि चित्रपट पूर्ण झाला.”
‘गमन’चे दिग्दर्शक मनोज नाईक साटम म्हणाले, “मी फोटोग्राफर होतो. लग्नाचे फोटो काढायचो. तेंव्हा व्हिडिओ शुटिंग पाहत पुढे आलो आणि त्यातून चित्रपट तयार करण्याचा विचार करत होतो. लहानपणापासून अनेक चित्रपटांची दृश्य मनात ठसली. एक कथा डोक्यात होती, ती लिहिली त्याची पुढे कादंबरी झाली. ती २०१५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि उमेद आली. त्याचाच पुढे चित्रपट झाला. हा चित्रपट करताना अर्थातच पैसे नव्हते. हातात होते ते सगळे पणाला लावले. केवळ वेडे होणे किंवा डुबणे, असे दोन पर्याय होते. मी डुबायचे ठरवले. कोकणातूनच पात्रं पुढे आली आणि चित्रपट पूर्ण झाला.”
‘ बाप्या’चे दिग्दर्शक समीर तिवारी म्हणाले, “मी उत्तर प्रदेशमधील आहे. मात्र बायको मराठी आहे आणि मला मराठीमधूनच चित्रपट करायचा होता. ४ वर्ष निर्माता मिळवण्यात गेले. शेवटी बायकोने पैसे उभे केले आणि चित्रपट तयार झाला. गिरीश कुलकर्णी यांनी मदत केली आणि माझ्या मनातील कथा पुढे आली. समाजातील गोष्टी ज्या मी पाहिलेल्या आहेत, त्याच चित्रपटात पुढे आल्या.”
‘ आदिशेष’चे दिग्दर्शक रमेश मोरे म्हणाले, “मी मुबईच्या झोपडपट्टीत वाढलो आहे. मी चित्रपट तयार करण्याचे कोणतेही तंत्र शिकलेलो नाही. चित्रपट करतच शिकत गेलो. मी साहित्याचा विद्यार्थी आहे. साहित्याच्या शिक्षकाने मला आत्मविश्वास दिला. चित्रपट तयार करण्याचा अडखळत हा प्रवास केला. साडेतीन वर्षे निर्माते शोधत होतो. प्रोजेक्ट आणि चित्रपट यात फरक असल्याचे निर्मात्यांच्या लक्षात येत नव्हते. शेवटी एक प्राध्यापक निर्माते म्हणून पुढे आले.” ते म्हणाले की कोविडमध्ये आपण जे अनुभवले. त्यातून आपल्यामधला शेष पुढे आला. तोच डोक्यात होता. आ. ह. साळुंके यांचे बळीवंश हे पुस्तक वाचले आणि कथेतील पात्रं पुढे आली. कोकणातूनच कलाकार चित्रपटात येत गेले आणि चित्रपट तयार झाला.
‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, “मला चित्रपट निर्मितीची काही पार्श्वभूमी नाही. १० वी मध्ये असताना पहिला चित्रपट पाहिला होता. तो डोक्यात घोळत होता. नंतर २०१३ मध्ये पहिली शॉर्टफिल्म तयार केली. ओटीटी मराठी चित्रपट नाकारत होते. मग सगळ्यांना दाखवावे असा विचार मानत होताच. रॉबर्ट मकी यांचे पटकथेवरचे पुस्तक वाचून अनेक चित्रपट पाहिले. त्यातून शिक्षण घेत गेलो. चित्रपटाचा विषय गोंधळ असा होता. मी अनेक गोंधळी मंडळींना बोलावले आणि त्यांची गाणी ऐकली. बँकेकडून कर्ज काढले आणि चित्रपट तयार केला.”
नव्या, जुन्या दिग्दर्शकांनी उलगडल्यात्यांच्या चित्रपट निर्मितीच्या कथा
Date:

