ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ; शेकडो वर्षांची परंपरा आजही अव्याहतपणे सुरू
पुणे : चिंचवड मधून श्री मोरया गोसावी पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळा पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला श्री जयति गजाननाच्या दर्शनासाठी थांबण्याची गेल्या शेकडो वर्षांची परंपरा आहे. श्रीमन्महासाधू मोरया गोसावी पालखी सोहळा यावर्षी देखील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात विसावला.
प्रथेनुसार ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचे सांप्रत ठकार, महिला, वहिवाटदार, पुजारी पालखीचे औक्षण करतात. त्यानुसार यंदा सांप्रत ठकार पुजारी, पल्लवी आल्हाद ठकार यांनी पालखीचे औक्षण केले. शेकडो वर्षांची ही परंपर आजही अव्याहतपणे चालू आहे.
यावेळी मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार, विश्वस्त स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मंदिराच्या विश्वस्त संगीता ठकार, मधुरा ठकार, सीमा ठकार, सुधा ठकार, गायत्री ठकार उपस्थित होत्या. चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंदार महाराज देव यांनी ग्रामदैवत श्री कसबा गणपती चे दर्शन घेतल्यानंतर सध्याचे पुजारी वहिवाटदार आल्हाद ठकार यांनी मंदार महाराज देव यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. मंदिरात मंदार महाराज देव यांचे औक्षण पल्लवी आल्हाद ठकार यांनी केले.
दरवर्षी माघ आणि भाद्रपद महिन्यच्या शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध चतुर्थी दरम्यान श्रीमन्महासाधू मोरया गोसावी यांची चिंचवड ते मोरगाव अशी पायी पालखी यात्रा संपन्न होते. यंदाच्या वर्षी दिनांक १९ जानेवारी रोजी माघ शु. प्रतिपदेला या पालखी सोहळ्याने चिंचवड येथून मोरगावकडे प्रस्थान केले. यानंतर पालखी सोहळा मुक्कामी मार्गस्थ झाला. चिंचवड देवस्थान आयोजित या पालखी यात्रेतील ग्रामदैवत श्री कसबा गणपती दर्शन हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.
ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने माघ गणेश जन्मोत्सवाला डॉ. पं. प्रमोद प्रभाशंकर गायकवाड आणि शिष्यांनी सनई वादनाने सुरुवात केली. त्यानंतर महाडकर गुरुजी यांचे गणेश पुराण झाले. सायंकाळी उस्ताद बिस्मिल्ला खा यांचे पट्ट शिष्य पंडित शैलेश भागवत यांचे शहनाई वादन झाले. त्यांना तबल्यावर महेश केंगार यांनी तर हार्मोनियम वर सुधीर टेकाळे यांनी साथ दिली.

