- आनंदी पाटील यांची माहिती; प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठीची एकमेव निवासी स्पर्धा
पुणे: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मएसो क्रीडा करंडक’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या २३, २४ व २५ जानेवारी २०२६ या तीन दिवशी ही स्पर्धा मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या प्रांगणात होणार आहे, अशी माहिती मएसो संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रसंगी शाळा समिती आणि मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, संस्थेचे सचिव अतुल कुलकर्णी, क्रीडावर्धिनीचे महामात्र व संस्थेचे सहसचिव सुधीर भोसले, शाळेच्या महामात्रा डॉ. नेहा देशपांडे, क्रीडावर्धिनीचे क्रीडासमन्वयक प्रा. शैलेश आपटे, बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा दुर्वे आणि उपमुख्याध्यापिका डॉ. वैशाली कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेच्या ‘वीर’ मॅस्कॉटचे अनावरण करण्यात आले.
आनंदी पाटील म्हणाल्या, “स्पर्धेचे हे १४ वे वर्ष असून, संपूर्ण महाराष्ट्रात ६ ते १० वयोगटाच्या खेळाडूंसाठी भरविण्यात येणारी ही एकमेव निवासी स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी ‘मएसो क्रीडा करंडक’ ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या क्रीडास्पर्धा दरवर्षी जानेवारी महिन्यात सलग तीन दिवस भरविल्या जातात. यात प्रामुख्याने सूर्यनमस्कार, लंगडी, डॉजबॉल आणि गोल खो-खो या सांघिक मैदानी खेळांचा समावेश असतो. खेळांमुळे विद्यार्थ्यांचे शरीर तंदुरुस्त राहते, ताकद, चपळता व एकाग्रता वाढते. यातून संघभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती विकसित होते. या सर्व कौशल्यांचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात खेळाडू म्हणून प्रगती साधताना निश्चितच फायदा होईल.”
विजय भालेराव म्हणाले, “संस्थेच्या सर्व प्राथमिक शाळांसह परिसरातील एकूण २० शाळांमधून सुमारे १२०० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. हा क्रीडा महोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने व प्लास्टिकमुक्त स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शिक्षकवर्गासाठी ‘झिरो वेस्ट मॅनेजमेंट’वर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. खेळाव्यतिरिक्त कला आणि साहित्य हे देखील व्यक्तिमत्व विकासाचे अंगभूत घटक आहेत. त्या अनुषंगाने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या आंतरशालेय स्पर्धांच्या काळात मुलांसाठी मोकळ्या वेळात ओरिगामी कार्यशाळा, जोशी रेल्वे संग्रहालय भेट, मेट्रो सफर, वाचक आणि कला कट्टा, मूल्याधिष्ठित लघुचित्रपट, मनोरंजनात्मक कार्यक्रम असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहे.”
या स्पर्धांच्या आयोजनासाठी विजय भालेराव, डॉ. नेहा देशपांडे, सुधीर भोसले, प्रा. शैलेश आपटे यांच्यासह संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा दुर्वे यांनी स्पर्धेचे संपूर्ण नियोजन केले, तर शाळेच्या उपमुख्याध्यापिका डॉ. वैशाली कुलकर्णी तसेच सर्व शिक्षिका, क्रीडाशिक्षक यांनी क्रीडास्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

