महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी तालुक्यांबाबत न्यायीक मार्ग काढण्यासाठी आशीर्वाद दे
पुणे दि. २३ : महाराष्ट्राचे काही तालुके दुष्काळग्रस्त झालेले आहेत, प्रदूषणाचा प्रश्न वाढला आहे, आरक्षणाच्या प्रश्नावर वेगवेगळे मोर्चे निघत आहेत. या सर्वांमधून न्यायिक मार्ग काढण्याची संधी आणि बुद्धी आमच्या सरकारला द्यावी अशी प्रार्थना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी पुण्यातील निवडुंगा विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या चरणी केली. आज कार्तिकी एकादशीनिमित्ताने डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी यांची सर्व धार्मिक विधी व महापूजा संपन्न झाली.
डॉ.गोऱ्हे पुढे म्हणाल्या की,पुढील वर्षाच्या डिसेंबर महिन्यातील कार्तिकी एकादशीला केंद्र व राज्य अशा दोन्ही ठिकाणच्या निवडणुका झालेल्या असतील अशा वेळी केंद्रात नरेंद्र मोदी हे परत पंतप्रधान व्हावे तसेच नामदार एकनाथ शिंदे यांना परत मुख्यमंत्री म्हणून संधी मिळावी अशी प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले, यावेळी ऐतिहासिक वारसा असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरातील विठ्ठलाच्या गाभाऱ्याला चांदीची प्रभावळ स्वखर्चातून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले, याप्रसंगी डॉ. गोऱ्हे काही वेळ महिला वारकऱ्यांच्या समवेत गळ्यात टाळ घेत भजनात रंगल्या होत्या.
यावेळी डॉ.गोऱ्हे यांच्या समवेत स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, निवडुंग विठोबा मंदिराचे पुजारी रविंद्र पाधे, विश्वस्त किशोर बाबर, ऍड अरुण स्वामी अनेक शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

