पुणे, दि. 18
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरभर स्वागतासाठी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. जगभरातील विविध देशांतून सहभागी होणाऱ्या सायकलपटूंच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि प्रवेशद्वारांवर रंगीत रांगोळ्या, आधुनिक कलात्मक पॅटर्न, तसेच सायकलिंगचा संदेश देणारी दृश्यात्मक सजावट करण्यात आली आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळेस विशेष प्रकाशयोजनेंतर्गत भव्य सायकल आकृती उभारण्यात आल्या असून, त्या पुण्याच्या क्रीडा व सांस्कृतिक ओळखीला नवा आयाम देताना दिसत आहेत.
पुणे कॅम्प, औंध, बाणेर, हिंजवडी तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रमुख मार्गांवर रस्ते सौंदर्यीकरण, रंगकाम व सजावटीची कामे अंतिम टप्प्यात असून, ही सजावट पाहण्यासाठी नागरिक थांबून कौतुक व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने पुणे शहर पुन्हा एकदा जागतिक नकाशावर ठळकपणे झळकणार असल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
ही स्पर्धा केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित न राहता पर्यटन, संस्कृती आणि शहराच्या जागतिक प्रतिमेला चालना देणारी ठरणार असून, पुणेकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या आयोजनाला वेगळेच वैभव प्राप्त झाले आहे.
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ निमित्त पुणे–पिंपरी शहरात जल्लोषाची तयारी
Date:

