मुंबई-महाराष्ट्रात भाजप आणि एमआयएम हे दोन जातीयवादी विचारांचे पक्ष आहे. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांची दोघांची युती आहे. एमआयएम आणि भाजप हे महाराष्ट्र धर्मासाठी बाधक आहेत, त्यांनी फिक्स करत ही निवडणूक लढवली, यामुळे त्यांच्या दोघांची ताकद वाढलेली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. जिन्ना आणि हिंदू महासभेची युती होती. बंगालमध्ये मुस्लीम लीगचा मुख्यमंत्री, तर जनसंघाचे मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते. ही दोघांची नैसर्गिक युती आहे, जी या निवडणुकीत समोर आली.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता जर वेळीच सावध झाली नाही तर ही लोकं राज्याचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे औवेसी(एमआयएम) आणि देवेंद्र फडणवीस(भाजप) यांची जी मैत्री आहे एकाच विचाराने ते दोघे पुढे वाटचाल करत आहेत, हे आपण ओळखले पाहिजे. हा काय नवीन विषय नाही.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेना गेली अनेक वर्षे मुंबई मनपा एकमेकांच्या विरोधात लढत आहे. मुंबईमध्ये काँग्रेसने वंचितसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.आमच्यावर होणारी टीका ही चुकीची आहे. वंचित आघाडीच्या नेत्यांची भावना आम्ही जाणून घेणार आहोत. वंचितचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पण जय-पराजय नाही तर आमच्यासाठी विचारांचा मेळ आहे. गांधी-आंबेडकर पॅटर्नने आम्हाला पुढे जायचे आहे त्या दृष्टीने आम्ही युती केली.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे पक्षांतर्गत आहे त्यावर कारवाई सुरू आहे. भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्यातील अंतर्गत संघर्षावर लवकरच समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सर्व काँग्रेस नेते एकत्रित काम करत आहोत. या टीम वर्कच्या माध्यमातून आम्ही एकत्र येत पक्ष पुढे नेणार आहोत.

