संगीत घराण्याचे सौदर्यमूल्य अभ्यासणे, जपणे महत्त्वाचे : पंडित सत्यशील देशपांडे
पंडित धनंजय खरवंडीकर, विदुषी कविता खरवंडीकर यांचा षष्ट्यब्दीनिमित्त गौरव सोहळा
पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात सर्व घराण्यांची सौंदर्यमूल्ये अभ्यासणे व जपणे महत्त्वाचे आहे. गुरूंच्या सहवासाने जीवन सूरमयी व आनंदी होते. धनंजय व कविता खरवंडीकर यांच्याशी शास्त्रीय संगीताविषयी होणारा संवाद या हृदयीचे त्या हृदयी असे हितगुज ठरते, असे मत ज्येष्ठ गायक व संगीत अभ्यासक पंडित सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ तबलावादक व संगीतकार पंडित धनंजय खरवंडीकर आणि आग्रा घराण्याच्या गायिका विदुषी कविता खरवंडीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पंडित सत्यशील देशपांडे बोलत होते. ज्येष्ठ तबलावादक पंडित ओंकार गुलवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. कल्परूप संस्थेच्या संचालिका व विदुषी खरवंडीकर यांच्या शिष्या धरित्री जोशी-बापट यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम एसएनडीटी सभागृहात झाला.
पंडित धनंजय खरवंडीकर यांचा सत्कार पंडित ओंकार गुलवडी तर विदुषी कविता खरवंडीकर यांचा सत्कार पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी शिष्यांच्या हस्ते खरवंडीकर दाम्पत्याचे गुरुपूजन झाले.
रागसंगीत व बंदिशींविषयी आजच्या काळात आस्था कमी प्रमाणात जाणवते असे निरीक्षण नोंदवून पंडित सत्यशील देशपांडे म्हणाले, अशा काळात कविता खरवंडीकर यांना बंदिशींमधील मर्म जाणून घेण्याची ओढ आहे आणि या विषयी त्या सखोल चिंतनही करीत आहेत. धनंजय यांचे वादन उपज अंगाचे असून तालाचे व गायनाचे सौंदर्य वाढविणारे असते.
पंडित ओंकार गुलवडी म्हणाले, गुरू व शिष्याचे नाते जन्मोजन्मीचे असते. गुरूचे प्रेम व आशीर्वाद मिळणे हे शिष्यासाठी उर्जादायी असते. कला क्षेत्रात धनंजय व कविता यांचे योगदान मोठे आहे. धनंजय यांच्या तबला वादनातील रचना या पारंपरिक असल्या तरी त्यात नाविन्यपूर्णता जाणवते.
सत्काराविषयी बोलताना पंडित धनंयज खरवंडीकर म्हणाले, गुरूंचे कौतुकाचे शब्द आमच्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहेत. गुरूंचे आशीर्वाद व मार्गदर्शनानेच आम्ही घडत गेलो. आमच्या हातून या क्षेत्रात अजूनही भरीव कार्य घडावे अशी इच्छा आहे.
कविता खरवंडीकर म्हणल्या, गुरूंनी भरभरून दिलेल्या ज्ञानाविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. गुरू हा शिष्याला घडवत असताना स्वत:ही घडत असतो
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी कविता खरवंडीकर यांची गायन मैफल रंगली. मैफलीची सुरुवात राग केदारमधील ‘बहुत गई, थोडी रही’ या बडा ख्यालने केली. त्यानंतर मध्यलय तीन तालातील ‘कंगनवा मोरा अत ही अमोला’ ही रचना सादर करून द्रुत एकतालातील ‘ए नवेली नार’ ही रचना ऐकविली. त्यानंतर राग नट बिहागमधील ‘कैसे कैसे बोलत मोसे लोगवा’ या रचनेला जोडून द्रुत तीन तालातील ‘झन झन झन पायल बाजे’ ही रचना प्रभावीपणे सादर केली. मैफलीची सांगता मिश्र तिलंगमधील ‘सावरिया तोपे वारी’ या ठुमरीने केली. मधुर आवाज, शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि भावपूर्ण सादरीकरणातून ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. पंडित धनंजय खरवंडीकर (तबला), पंडित उदय कुलकर्णी (संवादिनी), धरित्री जोशी-बापट, श्रुती खरवंडीकर (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली.
प्रास्ताविकात धरित्री जोशी बापट यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन आरती पटवर्धन यांनी केले तर आभार अनघा देशपांडे यांनी मानले. कलाकारांचा सत्कार दिप्ती जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

