मुंबई :महापालिकेच्या निवडणुकीत भाजप – शिंदे गटाचा विजय झाला. तर ठाकरे बंधूंच्या युतीला अवघ्या 71 जागांवर समाधान मानावे लागले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीकेची झोड उठवली. धारावीच्या माध्यमातून अदानी अख्खी मुंबई गिळंकृत करण्याचा डाव रचत असल्याचा आरोप करत त्यांनी धारावीकरांना याविरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले होते. त्याला आता निवडणूक निकालात जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. धारावीतील 7 पैकी 6 जागांवर ठाकरे बंधू व काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे.
धारावीच्या वॉर्ड क्रमांक 185 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार टी एम जगदीश यांनी भाजपच्या रवी राजा यांचा 2 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रवी राजा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. ते मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते होते. ते सायन – कोळीवाड्यातून लढत होते. धारावी त्यांचा मूळ मतदारसंघ नव्हता. याऊलट जगदीश हे याच वॉर्डाचे माजी नगरसेवक असल्यामुळे त्यांचा मतदारांवर प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी आपल्या अचूक रणनीतीच्या जोरावर भाजप उमेदवार रवी राजा यांना अस्मान दाखवले.
दुसरीकडे, वॉर्ड क्रमांक 186 मध्ये ठाकरे गटाच्या अर्चना शिंदे यांचा विजय झाला. त्यांनी भाजपच्या नीला सोनवणे यांचा पराभव केला. अर्चना शिंदे यांना 6731, तर सोनवणे यांना 5690 मते मिळाली. वॉर्ड क्रमांक 187 मध्येही ठाकरे गटाचे जोसेफ कोळी विजयी झाले. त्यांना 7067 मते मिळाली. या ठिकाणी काँग्रेसच्या आयशा खान 5753 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
वॉर्ड क्रमांक 189 मध्ये ठाकरे गटाच्या हर्षला मोरे यांनी भाजपच्या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार मंगला गायकवाड यांचा तब्बल 4479 मतांनी पराभव केला. हर्षला मोरे यांना 8081 मते मिळाली. उल्लेखनीय बाब म्हणजे वॉर्ड क्रमांक 185 व 189 मध्ये मतमोजणीवेळी ईव्हीएममध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे निकाल लागण्यास काहीसा विलंब झाला. पण अखेरीस ठाकरेंच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला.
धारावीतील 2 मतदारसंघांत स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला. वॉर्ड क्रमांक 183 मध्ये आशा काळे यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा 1254 मतांनी पराभव केला. तर वॉर्ड क्रमांक 184 मध्ये साजिदा बब्बू खान यांनी वर्षा नाकाशे यांचा 2 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. धारावीत महायुतीच्या केवळ एका उमेदवाराचा विजय झाला. वॉर्ड क्रमांक 188 मध्ये शिंदे गटाच्या भास्कर शेट्टी यांनी अवघ्या 460 मतांच्या फरकाने विजय मिळवला.
ठाकरे बंधूंच्या सभेने बदलले होते वातावरण
ठाकरे बंधूंची मुंबईतील शिवतीर्थावर सभा झाली होती. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानींचे साम्राज्य मुंबीत कशा पद्धतीने वाढत आहे हे सांगितले होते. या प्रकरणी त्यांनी एक व्हिडिओही दाखवला होता. तसेच आपल्याला वाचवायला कोण आहे आहे? हे लक्षात ठेवून मुंबईकरांना मतदान करण्याचेही आवाहन केले होते. ठाकरे बंधूंच्या या सभेने मुंबईतील वातावरण पालटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे घरे गमावण्याची भीती, स्थलांतराची चिंता व भवितव्याची अनिश्चितता या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम येथील मतदानावर दिसून आला आहे.

