विश्वनाथ स्पोर्टस् मीटः निकमारकडून एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचा १०२ धावांनी धुव्वा
लोणी काळभोर: एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या राष्ट्रीय स्तरावरील विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (व्हीएसएम–२०२६) अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत शनिवारी थरारक तसेच एकतर्फी सामने रंगले. उरुळीकांचन येथील निकम स्टेडियम व एमआयटी एडीटी विद्यापीठ मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यांत एमआयटी एडीटी विद्यापीठ व निकमार विद्यापीठाच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर प्रभावी विजय नोंदवत आपली ताकद सिद्ध केली.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या १७ षटकांच्या सामन्यात एमआयटी एडीटी विद्यापीठ संघाने श्री बालाजी विद्यापीठावर ११ धावांनी थरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना एमआयटी एडीटी संघाने नियोजनबद्ध खेळ करत १७ षटकांत ७ बाद १४५ धावा उभारल्या. सुरुवातीला निशांत चौधरी (१७ चेंडूत २६) आणि वेदांत कनोजिया (३५ चेंडूत ४७) यांनी दुसऱ्या गड्यासाठी उपयुक्त भागीदारी करत डाव सावरला. शेवटी योगेश पाटील (१२) आणि प्रणय वाघ (६) यांनी महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. तर श्री बालाजी विद्यापीठाकडून गोलंदाजीत अजय नरोटे(३-२७) व अंश सिंह (२-८) यांनी चांगली गोलंदाजी केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्री बालाजी विद्यापीठ संघाकडून मोहनीश ए. भारद्वाज याने आक्रमक फलंदाजी करत २९ चेंडूत ५७ धावा (६ चौकार, ३ षटकार) काढल्या. मात्र, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या भेदक गोलंदाजीमुळे शेवटच्या षटकांत धावगती मंदावली आणि श्री बालाजी संघाला १७ षटकांत ६ बाद १३४ धावांवर समाधान मानावे लागले. एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून आकांक्ष सिंह (२-१६) व नकुल शर्मा (२-३४) यांनी चांगली गोलंदाजी केली.
दरम्यान, उरुळी कांचन येथील निकम मैदानावर पार पडलेल्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात निकमार संघाने एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ(व्हीपीयू) संघाचा १०२ धावांनी दणदणीत पराभव केला. एमआयटी व्हीपीयूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. निकमारने प्रथम फलंदाजी करत १७ षटकांत ९ बाद १५२ धावा केल्या. कर्णधार ओम अशोक कोकणे याने २७ चेंडूत ९ चौकारांसह ४७ धावांची वेगवान खेळी साकारली, तर ऋतुराज तवरे याने १६ चेंडूत २२ धावा करत चांगली साथ दिली. एमआयटी व्हीपीयूकडून विक्रांत जाधव मल (३/२७) आणि शाश्वत भद्रे (२ बळी) यांनी गोलंदाजीत योगदान दिले.
१५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एमआयटी व्हीपीयूचा डाव पूर्णपणे कोसळला. ओम शिंदेच्या भेदक फिरकीसमोर एमआयटीचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही. ओम शिंदेने ४.१ षटकांत ११ धावांत ५ बळी घेत सामना पूर्णपणे निकमारच्या बाजूने झुकवला. वेदांत गिदये यानेही १० धावांत २ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. एमआयटी व्हीव्हीपीयूचा संपूर्ण संघ ११.१ षटकांत अवघ्या ५० धावांवर गारद झाला.
संक्षिप्त धावफलकः
एमआयटी एडीटी विद्यापीठ – १७ षटकांत ७ बाद १४५ (निशांत चौधरी २६ धावा-१७ चेंडू, वेदांत कनोेजिया ४७ धावा-३५ चेंडू, किशोर दिवटे ३१ धावा-२४ चेंडू;अजय नरोटे ३-२७, अंश सिंग २-८) वि.वि. श्री बालाजी विद्यापीठ – १७ षटकांत ६ बाद १३४ (मोहनिश ए. भारद्वाज ५७ धावा- २९ चेंडू, शिवम माने ३१; आकांक्ष सिंह २-१६, नकुल शर्मा २-३४) सामनावीरः वेदांत कनौजिया
—————-निकमार विद्यापीठ – १७ षटकांत १५२/९ (ओम अशोक कोकणे ४७ धावा- २७ चेंडू, ऋतुराज तवरे २२ धावा- १६ चेंडू; विक्रांत जाधव ३/२७, शाश्वत भद्रे २/२४) वि.वि.
एमआयटी व्हीपीयू – ११.१ षटकांत सर्वबाद ५० (सोमेश एस. ९, शाश्वत भद्रे ८; ओम शिंदे ५/११, वेदांत गिदये २/१०) सामानावीरः ओम शिंदे.

