मुंबई- राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या पराभवाचा धक्का बसला आहे. या ‘पानिपत’नंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेत आगामी सर्व निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर घेण्याची मागणी केली आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला जनतेचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारावा लागेल, असे मत मिटकरी यांनी व्यक्त केले.
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निकालांत भाजपला सर्वाधिक यश मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ अहिल्यानगरमध्ये चांगले यश प्राप्त झाले. मात्र, त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यातील यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करत, विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या या मागणीमुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ईव्हीएमवरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पराभवावर आश्चर्य व्यक्त करताना मिटकरी म्हणाले, “दोन्ही शहरांत प्रचंड काम करूनही आमचा पराभव कसा होऊ शकतो? ईव्हीएमचा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो, हा मोठा प्रश्न आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला जनतेचा विश्वास टिकवून ठेवायचा असेल, तर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घ्यावाच लागेल.”
दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “ही बैठक दैनंदिन प्रक्रियेचा भाग होती. कुटुंब म्हणून पवार कुटुंब नेहमीच एक आहे, मात्र राजकीय एकत्रिकरणाचा निर्णय हा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हेच घेतील.”
शुक्रवारी (१६ जानेवारी) जाहीर झालेल्या महानगरपालिकांच्या निकालात भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एकूण २९ पैकी २४ महापालिकांवर भाजप-शिंदेसेना युतीने वर्चस्व मिळवले असून, ९ ठिकाणी भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेचा आकडा गाठला आहे. भाजप हा राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला असून, जवळपास सर्वच ठिकाणी त्यांच्या जागा वाढल्या आहेत. याउलट उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेला आपल्या जुन्या जागा टिकवण्यातही अपयश आले आहे.

