पुणे-पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) 92 महिला उमेदवारांपैकी 67 महिलांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीमुळे एकूण 87 महिला नगरसेविका पुणे मनपा सभागृहात सहभागी होणार आहेत.यंदाच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला होता, तसेच आरपीआयच्या उमेदवारांनाही कमळाच्या चिन्हावर संधी दिली. एकूण 165 जागांपैकी तब्बल 92 जागांवर भाजपने महिलांना उमेदवारी दिली होती, ज्यामुळे महिलांना प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने संधी मिळाली.
भाजपच्या 67 महिला उमेदवारांव्यतिरिक्त, विविध विरोधी पक्षांनी दिलेल्या उमेदवारीतून 20 महिलांनी विजय मिळवून नगरसेवक पद पटकावले आहे. पुणे मनपाच्या एकूण 165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी आरक्षित होत्या, त्यामुळे राजकीय पक्षांना या जागांवर महिलांना उमेदवारी देणे बंधनकारक होते.
भाजपने केवळ आरक्षित जागांवरच नव्हे, तर सर्वसाधारण गटात चार आणि अनुसूचित जातीच्या गटात पाच महिला उमेदवारांना तिकीट देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. निवेदिता एकबोटे, पल्लवी जावळे, रंजना टिळेकर, अर्चना जगताप, संगीता दांगट आणि वीणा घोष यांनी महिला आरक्षित नसलेल्या जागांवर विजय मिळविला आहे .
प्रभाग क्रमांक 12, 18, 20, 22, 23, 24, 25, 26 आणि 29 मध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण अधिक होते. याचा लाभ महिला उमेदवारांना मिळाला आणि त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. महिला उमेदवार यांनी पुरुषांच्या बरोबरीने निवडणुकीत प्रचारात हिरारीने सहभाग घेतल्याचे देखील यावेळी दिसून आले आहे. विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत असतानाच ,नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांमध्ये देखील ओळखीतील महिला उपयोगी पडू शकते असे देखील महिला उमेदवारांनी घरोघर जाऊन प्रचार केला.

