पुणे- पुण्याच्या प्रभाग नंबर 25 मधील माझा पराभव हा जनतेने केला नाही तर तो सत्ताधाऱ्यांनी आणि EVM आणि भ्रष्ट निवडणूक अधिकारी काळे यांनी केलेला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी आपल्याला पराभव मान्य नसल्याचे सांगितले आहे. पुणे येथे मनपा प्रभाग क्रमांक 25 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला. न्यू इंग्लिश स्कूल येथे 17 ईव्हीएम बदलण्यात आल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला. त्यामुळे मतमोजणी दोन तास थांबून धरल्याने तणाव निर्माण झाला होता.
रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, मतदारांनी भाजपचे नगरसेवक निवडून दिलेले नाही. हे सत्ताधाऱ्यांनी बसवलेले नगरसेवक आहेत. मतमोजणीला कितीही वेळ लागला असता तर काही हरकत नव्हता. पण कसबा-विश्रामबागमधील अधिकारी हे पूर्ण मॅनेज होते. आमच्या EVM मशिनचे फुटेज आम्हाला देणं गरजेचे होते पण ते देण्यात आले नाहीत. आम्ही ते मान्य केले. मशीन बंद केले हे देखील आम्ही समजून घेतले. पण त्यासाठी लागणारी पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही. मशीनमध्ये मेमरी कार्ड असते त्यावर सील असते. येणाऱ्या मशीनचे सील उघडे नव्हते.आम्हाला लीगल प्रत देऊन तु्म्ही मशीन बदलतात. मेमरी कार्ड ठेवून तुम्ही मतदान बदलून प्रभाग 25 आणि प्रभाग 27 मध्ये सत्ताधारी भाजपचे पॅनल निवडून आणले. मशीनमधील मेमरी कार्डचा नंबर आम्हाला देण्यात आला नाही.
रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, प्रभाग 25 मधील पराभव मला मान्य नाही. कारण लोकांनी आम्हाला हरवलेले नाही. भाजपने EVM मध्ये घोटाळा करत, पोलिस यंत्रणा आणि अधिकारी हाताशी धरत त्यांनी आमचा पराभव केला आहे. तो आम्हाला मान्य नाही. आमच्या प्रभागात 30 टक्के ब्राह्मण समाज आहे तर 70 टक्के बहुजन समाज आहे, आमचा ब्राह्मण समाज हा अत्यंत शिकलेला आणि सुज्ञ आहे. काम करणाऱ्या लोकांना तो मतदान देतो. त्यांनी मतदान केले. त्यांनी मतदान भाजपला केलेले नाही. लोकांनी दिलेले मतदान ते मशीन बदलून देत असतील तर लोकांना पडलेले नाही, की सर्वांनी चालवले आहे का नाही हे बघायला.
रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, आम्ही मतदारांना का बोलू? मतदारांना तेवढा वेळ आहे का? प्रत्येक मतदाराला विचारावे का कोणाला मतदान दिले. ही सर्व लोकं काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान देतात. हा कौल माझ्या मतदारांचा नाही, हा भाजपचा आणि अधिकाऱ्यांनी दिलेला कौल मला मान्य नाही. मी लोकांसाठी काम करत आली आहे आणि करत राहणार. माझ्या पराभवात मतदार बंधू-भगिणींचा यात कोणताही दोष नाही. त्यांनी भाजपचे नगरसेवक निवडून दिलेले नाहीत. तर भाजपचे नगरसेवक हे डोक्यावर बसवलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी.

