पुणे : महानगरपालिका निवडणुकीत बाणेर-बालेवाडी प्रभाग क्रमांक नऊ या बहुचर्चित जागेवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी ८०० मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. त्याच सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबुराव चांदेरे देखील भाजपचे उमेदवार गणेश कळमकर यांचा १४०० मतांनी पराभव करून जिंकून आले आहेत.
या निवडणुकीत अमोल बालवडकर यांच्या उमेदवारीचा विषय महत्त्वाचा ठरला. मागील वेळी भाजपचे नगरसेवक असलेले बालवडकर यांचे ऐनवेळी पक्षाने तिकीट कापले होते. त्यानंतर त्यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. प्रचारादरम्यान त्यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यामुळे भाजपने हा प्रभाग प्रतिष्ठेचा करत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती.
पुणे शहरात भाजपची एकहाती सत्ता येऊन भाजपचा महापौर होण्याची शक्यता असली तरी, स्मार्ट सिटीचा भाग असलेला बाणेर-बालेवाडी परिसर भाजपच्या हातून निसटल्याने पक्षाला त्याची सल कायम राहणार आहे. या विजयामुळे अमोल बालवडकर यांनी या भागातील आपले अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
अमोल बालवडकर यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोथरूड मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते आणि वेळप्रसंगी अपक्ष लढण्याची तयारीही दर्शवली होती. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांची समजूत काढत, आगामी मनपा निवडणुकीत महापौर किंवा स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचे आश्वासन दिल्याचे बालवडकर यांनी म्हटले होते.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या दीड तास आधीपर्यंत त्यांना तिकीट मिळणार की नाही, याबाबत स्पष्ट संकेत न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही संधी हेरली आणि बालवडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिली. प्रचाराची पहिली सभा देखील अजित पवारांनी बाणेरमध्ये घेतल्याने ही निवडणूक केवळ मतदारसंघापुरती मर्यादित न राहता राज्यात प्रतिष्ठेची बनली होती.

