पुणे- भाजप नेते गणेश बिडकर यांनी तब्बल 9234 मतांच्या मोठ्या फरकाने माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर यांना धूळ चारली. या विजया नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आज या विजयाच्या क्षणी आपणास स्व. गिरीश बापट यांची आठवण येते असे म्हटले आहे. आज ते हवे होते अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महानगरपालिकेतील सर्वात प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये अत्यंत झालेल्या लढतीत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
रविंद्र धंगेकरांचे पुत्र प्रणव धंगेकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून, भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते गणेश बिडकर यांनी हा विजय संपादन केला आहे. गणेश बिडकर यांनी तब्बल 9234 मतांच्या मोठ्या फरकाने प्रणव धंगेकर यांना धूळ चारली. मागील निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता, मात्र यावेळेस बिडकरांनी त्या पराभवाचा वचपा काढला आहे.
धंगेकर कुटुंबासाठी हा निकाल दुहेरी धक्का देणारा ठरला आहे, कारण प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रभाग 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनी त्यांचा पराभव केला. एकाच वेळी घरातील दोन्ही प्रमुख उमेदवार पराभूत झाल्याने धंगेकर समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. पुण्याच्या राजकारणात ‘जायंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धंगेकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मिळवलेला हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान गणेश बिडकर हे नगरसेवक म्हणून निवडून आल्याचे आणि थेट ‘महापौर साहेब’ झाल्याचे बॅनर शहरात लावण्यात आले होते. अशातच आता बिडकर पुण्याचे महापौर होणार का? असा सवाल विचारला जात आहे. मुरलीधर मोहोळ यांचे खास म्हणून गणेश बिडकर यांची ओळख आहे. त्यामुळे आता पुण्यातील चित्र क्लियर होताना दिसत आहे.

