पुणे-पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३७ (धनकवडी–कात्रज डेअरी) येथील निकालाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली आहे. या प्रभागात भाजपने सर्व चारही जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे, शिवसेना नेते आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून, हा निकाल शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
प्रभाग क्रमांक ३७ मधून भाजपचे उमेदवार किशोर धनकवडे यांनी सर्वाधिक २६,९४१ मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला. त्यांच्यासोबत वर्षा तापकीर (२३,४४४ मते), अरुण राजवाडे (१५,०३३ मते) आणि तेजश्री बदक (१४,२६१ मते) यांनीही विजय मिळवला. या निकालामुळे भाजपचा संपूर्ण पॅनल या प्रभागात विजयी ठरला आहे.
दुसरीकडे, शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांना केवळ १०,६६१ मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. गिरीराज सावंत यांच्या पराभवामुळे स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रभागात भाजपने विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत प्रचार केला होता. मतदारांनी याला भरघोस प्रतिसाद दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. संघटित प्रचार, स्थानिक कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि केंद्र व राज्यातील सत्तेचा प्रभाव भाजपच्या विजयामागे प्रमुख कारणे ठरल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
एकूणच, प्रभाग क्रमांक ३७ मध्ये भाजपने ‘क्लीन स्वीप’ करत आपले राजकीय बळ दाखवून दिले आहे. या निकालानंतर शिवसेनेला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

