मुंबई-
वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी झोकून देऊन काम केले. त्याग व समर्पण भावनेतून असंख्य कार्यकर्त्यांनी पार्टीची विचारधारा तळागाळात पोहोचवली. हा विजय सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करतो, अशी भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नबीन, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढली. या निवडणुकीत भावनिक आवाहन करून मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, पण अशा भोंदूगिरीला जनता भुलत नाही, हेच स्पष्ट झाले आहे. भाजपाने विकासाच्या दिशेने निवडणूक लढवली. त्याला मतदारांचे आशीर्वाद लाभले त्याबद्दल धन्यवाद मानतो. असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका या भावनिक आवाहनांवर लढवल्या जात होत्या आणि अनेक मतदार त्या दिशेने प्रभावित होत होते. मात्र, ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारी ठरली.
‘व्हिजन महाराष्ट्र’ आणि महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्याच्या संकल्पनेला मतदारानी जो भरभरून आशीर्वाद दिला, त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकत्यांच्या वतीने मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो व कृतज्ञता व्यक्त करतो असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

