पुणे -सर्वाधिक श्रीमंत उमेदवार अशी चर्चा झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मधून संपूर्ण पॅनेलसह मिळालेल्या या विजयामुळे पूर्व पुण्यात भाजपने आपली ताकद वाढवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पठारे यांच्यावर भाषणातून टीकेचे आसूड ओढले होते . त्याच पठारेंना येथून संपूर्णतः विजय मिळाला आहे.
या निवडणुकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले होते. वडगावशेरी, वाघोली आणि येरवडा परिसर हा पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असताना, भाजपने येथे विजय मिळवून आपली उपस्थिती मजबूत केली आहे. भाजपने सुरेंद्र पठारे यांच्यावर विश्वास दाखवत प्रभाग क्रमांक ३ व ४ ची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली होती, ज्याला ते पात्र ठरले.पूर्व पुण्यात सत्ता काबीज केल्यानंतर, सुरेंद्र पठारे यांनी विजयी उमेदवार व पत्नी ऐश्वर्या पठारे यांना उचलून घेत आपला आनंद साजरा केला. प्रभाग तीन आणि चारमध्ये सुरेंद्र आणि ऐश्वर्या पठारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे दोन्ही पॅनल निवडून आले आहेत.

