पुणे-पुणे शहरातील प्रभाग क्रमांक २३ च्या निवडणूक निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. तुरुंगातून निवडणूक लढवलेल्या सोनाली वनराज आंदेकर यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. याच प्रभागात तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी देखील विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक २३ ही नेहमीच चुरशीची लढत पाहणारी जागा मानली जाते. प्रतिभा धंगेकर या नावाजलेल्या आणि प्रस्थापित उमेदवार होत्या. त्यांना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची राजकीय पार्श्वभूमी आणि संघटनात्मक ताकद लाभली होती, त्यामुळे त्या सुरुवातीपासूनच आघाडीवर मानल्या जात होत्या.
मात्र, दुसरीकडे सोनाली वनराज आंदेकर यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवत जनतेचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या उमेदवारीभोवती सहानुभूतीची लाट निर्माण झाली. “अन्यायाविरुद्ध लढणारी महिला” अशी त्यांची प्रतिमा मतदारांमध्ये रुजली. त्यांच्या समर्थकांनी प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार केला आणि आंदेकर यांचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवला.
मतमोजणीदरम्यान सुरुवातीला चुरशीची लढत पाहायला मिळाली. अंतिम फेऱ्यांमध्ये सोनाली आंदेकर यांनी निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. त्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत आनंद साजरा करण्यात आला.
या निकालामुळे धंगेकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, प्रस्थापित नेतृत्वाला मतदारांनी नाकारल्याची चर्चा सुरू झाली आहे. तुरुंगातून निवडणूक जिंकणाऱ्या सोनाली वनराज आंदेकर यांचा विजय हा केवळ वैयक्तिक नसून, सध्याच्या राजकीय व्यवस्थेविरोधातील जनभावनेचे प्रतीक मानले जात आहे. आगामी काळात या विजयाचे राजकीय पडसाद संपूर्ण पुण्यात उमटण्याची शक्यता आहे.
फक्त सोनालीच नाहीतर बंडू आंदेकर याची पत्नी लक्ष्मीनेही विजय मिळवला आहे. आंदेकर कुटुंबाने हा विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
तर प्रभाग क मध्ये उभ्या असलेल्या लक्ष्मी आंदेकरला १२,६३३ मते मिळालीत तर त्यांना भाजपच्या ऋतूजा गडाळे १२,४९३ यांनी टफ फाईट दिली. तर आंदेकरची मुलगी कल्याणी कोमकर यांनी २८२ मते मिळालीत. आंदेकर यांना विजयी घोषित करताच थेट मतमोजणी केंद्रातच घोषणाबाजी केली गेली. बंडू आंदेकरला जेव्हा अर्ज भरण्यासाठी आणले जात होते त्यावेळी त्याने माध्यमांसमोर नेकी का नाम आंदेकर का काम अशा घोषणा दिल्या होत्या.
लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी) १२६३३
निलम करपे (काँग्रेस) ६३४६
डॉ. वैष्णवी किराड (शिंदे गट) ६५८१
ऋतूजा गडाळे (भाजप) १२४९३
कल्याणी कोमकर २८२
नोटा : ११०३
विजयी- लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी)
सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी) १३८०७
विजया कद्रे (आप) ६८०
प्रतिभा धंगेकर (शिंदे गट) १०५७९
अनुराधा मंचे (भाजप) १०२८९
निकीता मारटकर (शिवसेना उबाठा) ४५२९
नोटा : १०२२
विजयी – सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी)

