पुणे, १६ जानेवारी २०२६ : ‘भारत फोर्ज लिमिटेड’च्या एअरोस्पेस विभागाने भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, सध्या सुरू असलेल्या इमर्जन्सी प्रोक्युअरमेंट – व्हीआय (ईपी-व्हीआय) या आराखड्याअंतर्गत सुमारे ३०० कोटी रुपयांचे करार मिळवले आहेत. हे करार भारतीय लष्करासाठीचे असून, त्यांचा अंतिम वापर भारतीय नौदलासाठीही होणार आहे.
या करारांमध्ये हेरगिरी, पाळत ठेवणे आणि माहिती संकलन (आयएसआर) या विषयीची प्रणाली तसेच ‘लॉइटरिंग म्युनिशन्स’सह विविध प्रकारच्या स्वदेशी मानवरहित प्रणालींचा समावेश आहे. ओमेगा वन, ओमेगा नाइन, बेयोनेट आणि क्लीव्हर ही करारबद्ध प्लॅटफॉर्म्स असून, विविध भूप्रदेशांमध्ये आणि वेगवेगळ्या मिशन गरजांसाठी तातडीच्या ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांची भारतातच निर्मिती करण्यात आली आहे.
जयपूर येथे १५ जानेवारी रोजी झालेल्या ‘आर्मी डे परेड’मध्ये अद्ययावत ‘बीएमपी-२’ या पायदळ लढाऊ वाहनावर ‘ओमेगा वन’चे भव्य प्रदर्शन करण्यात आले. भारताच्या संरक्षण नेतृत्वासमोर भारत फोर्ज लिमिटेडच्या क्षमतेची ठोस साक्ष देणारे ते अत्यंत महत्त्वाचे व ठळक आकर्षण ठरले. यातून ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने स्वदेशी उपाय देण्यावर भारत फोर्ज लिमिटेडचा ठाम भर दिसून येतो. देशातील वाढलेल्या उत्पादन क्षमतेचा वापर करून काम लवकर पूर्ण केले जात आहे. तसेच गुणवत्ता, विश्वासार्हता आणि भविष्यात वाढवता येईल अशी क्षमता यांचा पूर्ण विचार केला जात आहे.
‘बीएफएल’चा मानवरहित प्रणालींचा पोर्टफोलिओ वेगाने विकसित होत आहे. प्रगत स्वयंचलन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया या सर्व बाबी हळूहळू सर्व प्लॅटफॉर्म्समध्ये समाविष्ट केल्या जात आहेत. या सुधारणांमुळे मिशन अधिक काळ प्रभावीपणे करता येते, कामाची अचूकता वाढते, प्रणाली सुरक्षित व मजबूत राहते आणि अवघड तसेच सतत बदलणाऱ्या परिस्थितीतही सहज जुळवून घेता येते.
“ईपी-व्हीआय अंतर्गत करार मिळणे आणि आर्मी डेच्या दिवशी ओमेगा वनचे प्रदर्शन होणे, या दोन्ही गोष्टींमधून ‘आत्मनिर्भर भारत’साठी बीएफएलची बांधिलकी स्पष्ट होते,” असे भारत फोर्जचे उपाध्यक्ष व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी सांगितले. “भारताच्या सशस्त्र दलांसाठी या खास भारतात तयार केलेल्या, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आणि पूर्णपणे स्वदेशी मानवरहित प्रणाली देताना आम्हाला अभिमान वाटतो.”
डिझाइन, उत्पादन आणि नव्या स्वयंचलन तंत्रज्ञानात सतत गुंतवणूक करून भारत फोर्ज लिमिटेड मानवरहित प्रणालींच्या क्षेत्रात एक महत्त्वाची कंपनी बनत आहे. यामुळे भारतीय सशस्त्र दलांना विश्वासार्ह आणि भविष्यासाठी तयार असलेल्या प्रणाली मिळत असून, संरक्षण तंत्रज्ञानात भारत अधिक स्वयंपूर्ण होत आहे.

