पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज ४१ प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री साडेबारापर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी प्राप्त होऊ शकली नाही. मात्र पहाटे 4 वाजता महापालिकेने, शहरात सुमारे 52.42 टक्के इतके मतदान झाले असल्याचे जाहीर केले आहे.२०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत २०२६ मध्ये सुमारे पावणेचार लाख मतदारांची नव्याने भर पडल्याने त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, याची स्पष्टता आज येणार आहे.रात्रीचे साडेबारा वाजून गेले तरी महापालिका प्रशासनाला अंतिम टक्केवारी जाहीर करता आली नव्हती . २०१७ च्या निवडणुकीमध्ये पुणे शहरात ५५.६० टक्के इतके मतदान झाले होते.

पुणे महापालिकेची निवडणूक नऊ वर्षांनंतर होत असल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यामुळेच ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी तब्बल १ हजार १५५ उमेदवार रिंगणात होते. त्यातील दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शहरभरात ९३२ ठिकाणी ४ हजार ११ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे झालेल्या मतदानानंतर १ हजार १५३ मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.
मतदानाच्या या प्रक्रियेत २५ हजार ८९९ कर्मचारी सहभागी झाले होते तर शहरात ४ हजार १०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.
दुपारी साडेतीनपर्यंत शहरात ३७ टक्के मतदान झाले होते. पण साडेतीननंतर अनेक भागात मतदारांनी चांगली गर्दी केली. मतदानाची वेळ साडेपाचला संपण्यापूर्वी मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील मतदान केंद्रांवर मोठी रांग लागली होती.
जे मतदार साडेपाचच्या आधीपासून मतदान केंद्राच्या फाटकाच्या आतमध्ये रांगेत उभे होते. त्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला. सायंकाळचे साडेसात वाजून गेले तरीही काही ठिकाणचे मतदान सुरु होते. त्यानंतर सर्व ठिकाणची माहिती संकलित करून, मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली.
मतदान करणाऱ्यांचा आकडा हा १४ लाख ५० हजार इतका होता. तर २०२६ मध्ये सुमारे १८ लाख ७४ हजार जणांनी मतदान केले आहे. त्यामुळे नऊ वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत सुमारे पावणे चार लाखांपेक्षा जास्त मतदानाचा फायदा कोणाला होणार, हे आज स्पष्ट होणार आहे

