पुणे मनपा निवडणूक:
पुणे | दि. १५ जानेवारी २०२६
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान पुणे शहरातील विविध मतदान केंद्रांवर प्रशासनाचा प्रचंड ढिसाळपणा समोर आला आहे. प्रभाग क्रमांक २६ मधील ईव्हीएम बिघाड आणि केंद्रांवरील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या परिस्थितीची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून राज्य निवडणूक आयुक्तांना सविस्तर निवेदन पाठवले असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
ईव्हीएमचा क्रम उलट, मशीन चार वेळा बंद
प्रभाग २६ मधील सेंट हिल्डाज शाळेतील मतदान केंद्रावर अत्यंत गंभीर प्रकार घडला. येथील ईव्हीएम मशीन तब्बल चार वेळा बंद पडली, ज्यामुळे मतदारांच्या लांब रांगा लागल्या. धक्कादायक बाब म्हणजे, ईव्हीएम मशीनचा लावण्यात आलेला क्रम (अ, ब, क, ड ऐवजी ड, क, ब, अ) उलट होता. या मानवी चुकीमुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणातील हा मोठा अभाव असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.
उमेदवारांना भेदभावाची वागणूक
प्रभाग १२ मधील उमेदवारांना मतदान केंद्रात प्रवेश देताना भेदभाव करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यांना दमदाटी देखील करण्यात आली मात्र काही पक्षांचे उमेदवार सर्रासपणे जात येत होते.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचे हाल
शहरातील प्रभाग २६ आणि ६ मधील अनेक केंद्रांवर पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची कोणतीही सोय नव्हती. कडक उन्हात उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांगांसाठी बसण्याची व्यवस्था किंवा व्हीलचेअर उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल झाले. केंद्रावर सूचना देण्यासाठी ‘माईक’ची व्यवस्था नसल्याने तांत्रिक बिघाडानंतर मतदारांना माहिती मिळत नव्हती, परिणामी केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकारात्मक बाजूंचेही केले कौतुक
एकीकडे तक्रारींचे पाढे असतानाच, डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाच्या काही चांगल्या उपक्रमांचे कौतुकही केले. काही ‘आदर्श मतदान केंद्रां’वर केलेली आकर्षक सजावट, सेल्फी पॉईंट आणि नवीन मतदारांचे गुलाबपुष्प देऊन केलेले स्वागत यामुळे लोकशाहीचा उत्साह वाढल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच काही केंद्रांवरील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
निवडणूक आयुक्तांकडे चौकशीची मागणी
“निवडणूक आयोगाचा ‘उत्सव लोकशाहीचा’ हा नारा केवळ जाहिरातींपुरता मर्यादित न राहता, प्रत्यक्षात मतदारांना सुविधा मिळणे आवश्यक आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी ठणकावून सांगितले. शेवटच्या तासातील मतदानाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असलेली अस्पष्टता आणि तांत्रिक त्रुटींची चौकशी करून भविष्यात सुधारित नियमावली लागू करण्याची आग्रही मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

