पुणे – पुणेकरांनी मागील निवडणुकीत कारभारी बदलण्याचा स्पष्ट संदेश दिला असून, यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुण्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढत असून सत्तास्थापनासाठी कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. निकालात भाजपला १२० ते १२५ जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. निवडणूक मतदान समाप्तीनंतर प्रभाग क्रमांक २५ मध्ये स्वरदा बापट यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मोहोळ यांनी आमदार हेमंत रासने यांच्यासह उमेदवार व कार्यकर्त्यांसोबत ‘भेळ भत्ता’ करत आनंद साजरा केला. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, भाजपमध्ये वर्षानुवर्षे एक परंपरा आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर सर्वजण एकत्र येऊन भेळ भत्ता करतात. कसबा मतदारसंघात यंदा हा कार्यक्रम घेण्यात आला असून ही जुनी परंपरा संघटनेतील एकतेचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले, निवडणुकीत काहींना संधी मिळते तर काहींना मिळत नाही, मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करतात. प्रतिकूल परिस्थितीत पक्षासाठी झटणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवूनच आज भाजप वटवृक्षासारखा उभा आहे. संघटना म्हणून काम केल्यामुळे आज सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. उद्या गुलाल उधळण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. मोहोळ यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, काही ठिकाणी मतदानावेळी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. निकालानंतरही विरोधक ईव्हीएमवर आरोप करत बसतील. पुण्यात भाजपने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. राज्यात आणि केंद्रात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी अपेक्षा होती. मात्र आरोप झाले तर प्रत्युत्तर द्यावेच लागते. गुंड निलेश घायवळ प्रकरणात माझ्यावर झालेले आरोप अजित पवार यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.हडपसर मध्ये आमच्या उमेदवाराने घेतलेल्या दक्षतेमुळे बोगस मतदान करायला आलेले दोन / एक हजार लोक पकडले गेल्याची माहिती देखील मोहोळ यांनी दिली .
बोगस व्होटिंग: हडपसरमध्ये दोन हजार लोक पकडल्याची केंद्रीय मंत्र्यांची माहिती
Date:

