मुंबई-महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचे आरोप राज्य निवडणूक आयुक्तांनी जोरकसपणे फेटाळून लावलेत. राज्य निवडणूक आयोग मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. ही शाई बोटावर लावण्यासाठी तिला सुकण्यासाठी 10-12 सेकंद लागतात. एवढा वेळ मतदार मतदान केंद्रातच असतो. त्यामुळे शाई पुसली जाण्याची कोणतीही शक्यता नाही, असे त्यांनी म्हटले आहे. सोबतच पाडू या यंत्राचा 2004 पासून वापर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. त्यातच काही ठिकाणी मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्वतःहून पत्रकारांना सामोरे जात शाई पुसली जात असल्याच्या आरोपांत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
दिनेश वाघमारे म्हणाले, राज्य निवडणूक आयोग मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. ही शाई बोटावर लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी 10 ते 12 सेकंद लागतात. मतदार एवढा वेळ संबंधित मतदान केंद्रावरच असतो. एकदा ही शाई वाळल्यानंतर ती कोणत्याही प्रकारे काढता येत नाही. ही शाई वेगळी नाही. भारतीय निवडणूक आयोग जी शाई वापरतो, तीच ही शाई आहे. एखादा मतदार एकदा मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान केंद्रावर आला, तर तेथील निवडणूक अधिकारी निश्चितच त्याच्यावर कारवाई करतात.
शाई पुसली जात असल्याविषयी केवळ संभ्रम निर्माण केली जात आहे. ही शाई 2011 पासून आम्ही मार्कर पेनच्या स्वरुपात वापरत आहे. त्यामुळे याच निवडणुकीत अशा प्रकारचा संभ्रम पसरवणे चुकीचे आहे. याशिवाय लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतही अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. पण शाई वाळल्यानंतर ती पुसली जात नाही.
आयुक्त वाघमारे म्हणाले, शाई पुसण्यासाठी नेलपेन्ट रिमूव्हर व सॅनिटायझरचा वापर केला जात असल्याची तक्रार आहे. शाई तासाभरानंतरही पुसली जात जात आहे. पत्रकारांनी ही गोष्ट निवडणूक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर त्यांनी ही गोष्ट फेटाळून लावली. आम्ही पूर्वीपासूनच कोरस कंपनीचे मार्कर पेन वापरत आहोत. त्यामुळे शाई पुसली जात असल्याचे आरोप चुकीचे आहेत. आमच्या कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान केले. त्यापैकी कुणाचीही शाई पुसली गेली नाही. मुंबईसह सर्वच ठिकाणी दुबार मतदारांची ओळख पटल्याशिवाय मतदान करू दिले जात नाही. दुबार मतदारांना दोन ओळखपत्र मागितले जात आहेत.
मतदान कक्षात मतदान प्रतिनिधी आहेत. ते उमेदवारांचे प्रतिनिधित्व करतात. ते संबंधित प्रभागातीलच असतात. त्यामुळे त्यांना असा एखादा प्रकार आढळून आला तर त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल. या प्रकरणी आयोग चौकशी करेल. पण ही शाई पुसली जात नाही असा आमचा दावा आहे असे ते म्हणाले.
निवडणूक आयुक्तांनी यावेळी निवडणूक आयोग या निवडणुकीत पूर्णतः तटस्थ असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. निवडणूक आयोग पूर्णतः निष्पक्षपणे काम करत आहे. आयोग कुणालाही कोणते झुकते माप देत नाही. या प्रकरणी मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे. फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे. सर्व गोष्टी आयोगावर ढकलल्या जात आहेत. खरे तर मतदार याद्यांमधील आपले नाव शोधण्याची जबाबदारी मतदारांचीही आहे.
आयोगाने पोर्टल व मोबाईल अॅपही उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय 85 टक्क्यांहून मतदारांना व्होटर स्लिपही पुरवण्यात आली आहे. त्यात मतदारांचे मतदान केंद्रही दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आपले नाव वेळेवर शोधून योग्य त्या पोलिंग स्टेशनवर जाणे ही मतदारांची आहे, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी मतदारांचा टक्का चांगला आहे. मार्कर पेनचा अनुभव घेता, जिल्हा परिषद निवडणुकीला इंटेल इंक वापरणार आहोत. मतदानांचे प्रमाण 35 टक्के आहे. 2 टक्के ईव्हीएम खराब झाल्या आहेत. मागील 10 वर्षांमध्ये एकही ईव्हीएम विकत घेतली नाही. त्याच त्या ईव्हीएम मशीन वापरत आहे. त्यामुळे 2 टक्के ईव्हीएम खराब होण्याचे प्रमाण आहे, असेही वाघमारेंनी यावेळी सांगितले

