पुणे-महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईऐवजी वापरल्या जाणाऱ्या मार्कर पेनमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पारंपरिक न निघणाऱ्या शाईऐवजी यंदा मार्करचा वापर करण्यात आल्याने मतदान केल्यानंतर बोटावरील खूण पुसली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे आरोप होत आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूर, उल्हासनगरसह विविध शहरांतून या संदर्भातील तक्रारी, व्हिडिओ आणि प्रत्यक्ष घटना समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
पुण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत खळबळ उडवून दिली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 34 (नऱ्हे, वडगाव बुद्रुक, धायरी) येथे काही महिलांकडून बोटावरील शाई लिक्विड किंवा फिनरसारख्या द्रवाने पुसून पुन्हा मतदान केल्याचा दावा त्यांनी केला आहे. धायरी फाट्याजवळील नारायणराव सणस विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर सकाळी साडेदहाच्या सुमारास असा प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी बोटावरील खूण पुसताना आढळलेल्या एका व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडून मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बोगस मतदानाच्या आरोपांना अधिक बळ मिळाले आहे.
मुंबईतही मतदान करून परतलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदारांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने खूण करण्यात येत आहे. मात्र, या मार्करची शाई विशेषतः नखावरून सहज निघत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनीही बोटावरील नखावरची शाई पुसली जात असल्याची कबुली दिली आहे. काही व्हिडिओ समोर आल्यानंतर आयुक्तांकडे तक्रारी दाखल झाल्या असून, त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. यापुढे शाई त्वचेवर अधिक गडद आणि ठळक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

