पुणे. दि.१५: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक २६ येथील सेंट हिल्डाज शाळेतील मतदान केंद्रावर गेल्या काही तासांपासून ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा आरोप उमेदवार आणि मतदारांनी केला आहे. या बूथवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची सखोल माहिती घेतली आणि निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, या केंद्रावर ईव्हीएम मशीन चार वेळा बंद पडली होती. शिवाय मशीन ठेवण्याचा क्रमही उलटा ठेवण्यात आला होता. सामान्यतः अ, ब, क, ड असा क्रम असावा तेथे ड, क, ब, अ असा क्रम लावण्यात आला होता. यामुळे मतदारांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकच्या मशीन तयार ठेवण्याची सूचना केली आहे. जेणेकरून मशीन बंद पडल्यास मतदान प्रक्रियेत व्यत्यय येणार नाही आणि वेळ वाया जाणार नाही. तसेच मतदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्व मतदारांना सुरळीत मतदान करता यावे यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

