पुणे.दि.१४: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (१५ जानेवारी) मतदान होत आहे. या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या अधिकृत धनुष्यबाण चिन्हावर लढणाऱ्या सर्व उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांना व कार्याला स्मरून धनुष्यबाणाला मत द्या. बाळासाहेबांच्या आदर्शाने मराठी व राष्ट्रीय अस्मितेचा भगवा ध्वज सर्व महाराष्ट्रात फडकवण्यासाठी या निवडणुकीत भरभरून यश द्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामांचे कर्तृत्व पाहून मतदार नक्कीच धनुष्यबाणाला मतदान करतील, असा विश्वास आहे.”
ते पुढे म्हणाल्या, “मतदानासाठी वेळेवर बाहेर पडा. शासनाने सुट्टी दिली आहे, वाहतूक व इतर सुविधा उपलब्ध आहेत. एकूण वातावरण चांगले आहे, त्यामुळे लोकांना पोहोचणे सोपे आहे. कोणताही दबाव आल्यास किंवा अडचण आल्यास आम्ही सदैव तुमच्यासाठी तत्पर आहोत.”
डॉ. गोऱ्हे यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा देताना सांगितले, “संक्रांतीनंतरचा हा सुंदर दिवस आहे. तिळगूळ घ्या आणि गोड बोला, पण निवडणुकीत निर्भयपणे मतदान करा. लोकशाहीची पहिली पायरी म्हणजे निर्भय मतदान. पैशांचा वर्षाव होत असला तरी भारताचा मतदार परिपक्व आहे. इतिहास साक्षी आहे की पैशाचा वापर करूनही जनशक्तीसमोर अहंकारी उमेदवार सामान्य ठरतो.”
त्यांनी विशेषतः स्त्री शक्तीवर भर देत सांगितले की, “या निवडणुकीत लाडक्या बहिणी सूत्रधाराची भूमिका बजावतील. स्त्री शक्तीचा विजय होईल, याची खात्री आहे.”
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल. डॉ. गोऱ्हे यांनी सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

