पुणे : “बांधकाम क्षेत्रात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संशोधन, नवोन्मेष आणि प्रत्यक्ष प्रकल्पांतील अनुभव आत्मसात करणे आवश्यक आहे. नव्या तंत्रज्ञानासोबतच पर्यावरणपूरक व शाश्वत बांधकामाकडे वळणे काळाची गरज आहे. या बदलात विद्यार्थीच भविष्यातील नेतृत्व करतील. त्यामुळे त्यांच्यातील कल्पकता, प्रयोगशीलता आणि सामाजिक जाणीव जोपासली गेली पाहिजे,” असे मत कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष अभय पुरोहित यांनी व्यक्त केले.
पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाऊंडेशन (पीसीईआरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कन्स्ट्रो २०२६’ या चार दिवसीय विसाव्या आंतरराष्ट्रीय बांधकाम प्रदर्शनात ‘पीसीआरईएफ–बी. जी. शिर्के विद्यार्थी अवॉर्ड’ वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील स्थापत्य अभियांत्रिकी व आर्किटेक्चर शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीसीआरईएफ–बी. जी. शिर्के विद्यार्थी अवॉर्ड’ प्रदान करण्यात आले. बांधकाम क्षेत्रातील नवोन्मेषी संकल्पना, संशोधनाधारित प्रकल्प आणि व्यावहारिक उपयुक्तता या निकषांवर पुरस्कारार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास विशेष अतिथी एन. व्ही. कुदळे, बी. जी. शिर्के उद्योग समूहाचे आर. बी. सूर्यवंशी, ‘कन्स्ट्रो २०२६’चे चेअरमन जयदीप राजे, ‘पीसीईआरएफ’चे अध्यक्ष नरेंद्र कोठारी, शिरीष केंभावी, जयंत इनामदार आदी पदाधिकारी, उद्योग प्रतिनिधी, तज्ज्ञ अभियंते, प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत उपस्थित मान्यवरांनी ‘कन्स्ट्रो २०२६’सारख्या व्यासपीठामुळे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील दुवा अधिक मजबूत होत असल्याचे नमूद केले.
जयदीप राजे यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना अशा पुरस्कारांमुळे नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे ‘कन्स्ट्रो’मध्ये विद्यार्थ्यांचा दरवर्षी गौरव करण्यात असल्याचे सांगितले. मृणालिनी साने यांनी सूत्रसंचालन केले.

