मुंबई १४ जानेवारी 2026: मराठी मनोरंजनविश्व भय आणि रहस्याचा नवा अध्याय उघडण्यासाठी सज्ज झालेलं आहे. राजेश चव्हाण यांच्या दिग्दर्शनाखाली एक थरारक अल्ट्रा झकास ओरिजिनल हॉरर ‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे. ही वेब सिरीज अल्ट्रा झकास ओटीटीवर मराठी भाषेत आणि अल्ट्रा प्ले ओटीटीवर हिंदी भाषेत २३ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ ही कथा सानिका नावाच्या एका तरुणीभोवती फिरते, जी एका प्राचीन वाड्याशी संबंधित अदृश्य रहस्य, भयानक आणि अकल्पित घटनांमध्ये अडकते. हा वाडा एका क्रूर आत्म्याशी धर्मसेन जोडलेला आहे, जो आपल्या लोभामुळे मृत्यूनंतरही आपल्या खजिन्याचे रक्षण करत असतो. या प्रवासात सानिकाला अनाकलनीय शक्तींचा अनुभव येतो, तिचे रूप बदलते आणि ती धर्मसेनाची पत्नी हेमावतीच्या छायेत अडकते.
या वेब सिरीजमध्ये एका जुन्या वाड्याच्या बंद दारांमागे अनेक वर्षांचं अदृश्य रहस्य आणि एक भयानक शाप दडलेलं असतं. या वाड्यात दडलेला आहे विज्ञानाच्या पलीकडचा अदृश्य शक्तींचा खेळ, जिथे भूतकाळातील चुका वर्तमानात भयानक रूपाने समोर येताच थराराचा न थांबणारा प्रवास सुरू होतो.
चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री सुहास जोशी एका अत्यंत वेगळ्या आणि रहस्यमय भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘मुंज्या’ चित्रपटातील आजीच्या भूमिकेप्रमाणेच, ही भूमिका कथेला वेगळीच गहनता देणारी ठरेल. सोबत सानिया चौधरी, अभिनय सावंत, रोशन विचारे, तसेच सध्या मराठी मालिकाविश्वात प्रचंड लोकप्रिय असलेले कश्यप परुळेकर आणि नयन जाधव हे दमदार कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये पहायला मिळणार आहेत.
ही सिरीज सध्या मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, लवकरच ती कन्नड भाषेसह अन्य भाषांमध्ये प्रदर्शित होईल. त्यामुळे ‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ केवळ एका प्रदेशापुरती मर्यादित न राहता, देशभरातील प्रेक्षकांना भय, रहस्य आणि थराराचा अनुभव देणार आहे.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट चे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “आमच्या उद्देशाचा नेहमी एकच मार्ग आहे – प्रेक्षकांना उच्च दर्जाचे, समृद्ध आणि भावनिक अनुभव देणे. ‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ ही हॉरर सिरीज प्रेक्षकांना एक मजबूत कथा, उत्कृष्ट अभिनय आणि प्रभावी मांडणी यांमुळे एक वेगळाच अनुभव देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
भय, भावनिक नाती, आत्मिक संघर्ष आणि स्त्रीशक्तीचा प्रभावी प्रवास दाखवणारी ‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ ही केवळ एक हॉरर कथा नाही, तर स्वतःच्या सामर्थ्यावर उभे राहण्याची आणि अंधारावर मात करण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.

