लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (व्हीएसएम–२०२६) अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत बुधवारी रंगतदार आणि एकतर्फी सामने खेळविण्यात आले. एमआयटी–एडीटी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात व निकम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांत डी.वाय. पाटील रायत, ख्रिस्त कॉलेज आणि कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग संघांनी प्रभावी विजय नोंदवत आपली ताकद दाखवून दिली.
एमआयटी–एडीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात डीवाय पाटील रायत संघाने सरहद कॉलेजवर ५८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत डीवाय पाटील रायतने १४ षटकांत ९ बाद १५७ धावांचा भक्कम डाव उभारला. ख्रिस फर्नांडिसने अवघ्या १८ चेंडूत ४९ धावांची स्फोटक खेळी करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, तर शार्विलने ३१ धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. प्रत्युत्तरात सरहद कॉलेजचा संघ आरएआयटीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही आणि १४ षटकांत ७ बाद ९९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. ध्रुव गवळीने निर्णायक क्षणी दोन महत्त्वाचे बळी घेतले.
निकम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या चौथ्या सामन्यात ख्रिस्त कॉलेजने व्हीआयटीच्या पीव्हीपीसीओए संघावर पूर्ण वर्चस्व राखत १० गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणारा व्हीआयटी पीव्हीपीसीओए संघ ख्रिस्त कॉलेजच्या आक्रमक गोलंदाजीसमोर १२.४ षटकांत ७८ धावांत गारद झाला. यश जाधवने केवळ १३ धावांत ४ बळी घेत सामना एकतर्फी केला. ७९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक राठोड व ओवेस अन्सारी या सलामीवीरांनी एकही गडी न गमावता अवघ्या ७.३ षटकांत विजय मिळवून दिला.
पाचव्या सामन्यात कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगने एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगवर १०६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कीस्टोनने १६ षटकांत ४ बाद १६५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. तेजस हणमंत आरेकरीने ४३ चेंडूत ६२ धावांची शानदार खेळी केली, तर कर्णधार मोहन कदमने अवघ्या २७ चेंडूत नाबाद ५६ धावा करत आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवले. प्रत्युत्तरात एमआयटी एसओईचा संघ १०.४ षटकांत केवळ ५९ धावांत गारद झाला. प्रणव टक्सलने ४/१४ अशी उत्कृष्ट गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक :
डीवाय पाटील रायत : १४ षटकांत ९ बाद १५७ (ख्रिस फर्नांडिस ४९ – १८ चेंडू, शार्विल ३१ – २९ चेंडू; विश्वजित पाटील ४-४४) वि.वि. सरहद कॉलेज : १४ षटकांत ७ बाद ९९ (प्रतिक खेडकर ३१ – २० चेंडू, पवन राठोड २१ – २५ चेंडू; ध्रुव गवळी २-५); सामनावीरः ख्रिस फर्नांडिस.
व्हीआयटी पीव्हीपीसीओए : १२.४ षटकांत सर्वबाद ७८ (रूज सम्यक २२ – १५ चेंडू; यश जाधव ४-१३, ओवेस अन्सारी २-९) पराभूत वि. ख्रिस्त कॉलेज : ७.३ षटकांत बिनबाद ८१ (अभिषेक राठोड* ३१ – १८ चेंडू, ओवेस अन्सारी* ३० – २८ चेंडू); सामनावीरः यश जाधव.
कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग : १६ षटकांत ४ बाद १६५ (तेजस हणमंत आरेकरी ६२ – ४३ चेंडू, मोहन कदम* ५६ – २७ चेंडू; शिवम २-१४) वि.वि. एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग : १०.४ षटकांत सर्वबाद ५९ (देवराज बामणे २० – २० चेंडू; प्रणव टंकसाळ ४-१४); सामनावीर : तेजस आरेकरी

