मतदार कार्ड हरवलं तरी मतदान शक्य कसं?:मतदार यादी तपासण्यापासून स्लिप डाऊनलोडपर्यंत सगळी माहिती

Date:

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये 41 प्रभागातून 165 सदस्यांच्या निवडणुकीसाठी 4011 मतदान केंद्रावर दि.15 जानेवारी 2026 रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ईव्हीएम द्वारे मतदान घेण्याची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक त्या सुविधा पाणी, शौचालये, सावली साठी शेड इ. पुरविण्यात आलेले आहेत.

मुंबई वगळता राज्यातील 29 पैकी 28 महानगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धतीने निवडणुका होत असून या प्रक्रियेत मतदार हा केंद्रस्थानी आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत उमेदवार आणि पक्ष व्यस्त असताना, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी नागरिकांचा सहभाग किती असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आजही अनेक मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसणे, ते हरवणे किंवा उपलब्ध नसणे, ही मोठी अडचण ठरते. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदारांसाठी मोठा दिलासा देणारी सवलत जाहीर केली आहे.

‘मतदार कार्ड नाही म्हणजे मतदान नाही’ हा समज चुकीचा

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र म्हणजेच EPIC कार्ड असणे उपयुक्त असले, तरी ते बंधनकारक नाही. मतदानासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अधिकृत मतदार यादीत नाव नोंदलेले असणे. जर एखाद्या नागरिकाचे नाव मतदार यादीत असेल, तर त्याला मतदानाचा हक्क नाकारता येत नाही. त्यामुळे ‘कार्ड नाही म्हणजे मतदान नाही’ हा समज चुकीचा असून आयोगाने या संदर्भात स्पष्ट नियम आखून दिले आहेत.ज्या मतदारांकडे मतदार कार्ड नाही, त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. अशा मतदारांना मतदान केंद्रावर ‘वोटर स्लिप’ म्हणजेच निवडणूक पावती आणि त्यासोबत अन्य सरकारमान्य फोटो असलेले ओळखपत्र दाखवून मतदान करता येते. निवडणूक स्लिप ही केवळ मतदान केंद्र, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक सांगणारी पावती असते, त्यामुळे ती एकटी पुरेशी नसते. ओळख पटवण्यासाठी फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

कोणतेही एक ओळखपत्र दाखविल्यास प्रवेश

निवडणूक आयोगाने पर्यायी ओळखपत्रांची स्पष्ट यादी दिली आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा जॉब कार्ड, फोटो असलेले पेन्शन कार्ड, केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी ओळखपत्र, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटोसह पासबुक, तसेच कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड यांचा समावेश आहे. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखविल्यास मतदाराला मतदान केंद्रात प्रवेश दिला जाऊ शकतो.
मतदार यादीत नाव कसे शोधावे?

निवडणुकीच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी मतदारांनी आधीच आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा मागील निवडणुकीत नाव यादीत असते, म्हणून यावेळीही असेल, असा समज केला जातो. मात्र प्रत्यक्षात मतदार याद्या प्रत्येक निवडणुकीपूर्वी अद्ययावत केल्या जातात. स्थलांतर, मृत्यू, नावातील दुरुस्ती, पत्त्यातील बदल किंवा प्रशासकीय चुका यामुळे काही वेळा नाव वगळले जाऊ शकते.
मतदार यादीत नाव तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने सोपी आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन कोणताही नागरिक काही मिनिटांत आपले नाव तपासू शकतो. ‘Voter Helpline’ ॲपच्या माध्यमातूनही हीच सुविधा उपलब्ध असून, मोबाईलवरूनच संपूर्ण माहिती मिळू शकते. त्यामुळे मतदानाच्या दिवशी अप्रिय धक्का बसू नये, यासाठी आधीच खात्री करून घेणे गरजेचे आहे.
ऑनलाईन पद्धतीने नाव शोधण्यासाठी सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.inया संकेतस्थळावर जावे लागते. वेबसाईटच्या मुख्य पानावर ‘Search by Details’, ‘Search by EPIC’ आणि ‘Search by State’ असे तीन पर्याय उपलब्ध असतात. यासोबत कॅप्चा कोड भरून सर्च करता येते. आवश्यक माहिती भरल्यानंतर ‘Search’ बटणावर क्लिक केल्यास मतदार यादीतील तपशील स्क्रीनवर दिसतो.
नाव, EPIC नंबर, मतदान केंद्र, भाग क्रमांक आणि इतर माहिती येथे पाहता येते. जर एका पद्धतीने नाव सापडले नाही, तर उर्वरित दोन पर्यायांचा वापर करता येतो. तरीही नाव न सापडल्यास संबंधित राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मतदार यादीतील तपशीलात काही चूक असल्यास, निवडणुकीच्या किमान दहा दिवस आधीपर्यंत दुरुस्ती करून घेण्याची संधी उपलब्ध असते.
एसएमएसद्वारेही मतदार यादीतील नाव तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी एसएमएस टाईप करताना आधी स्पेस द्यायची आणि नंतर मतदार ओळखपत्र क्रमांक लिहायचा. हा मेसेज 9211728082 किंवा 1950 या क्रमांकावर पाठवावा लागतो. प्रत्युत्तरात मतदाराचा भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आणि नाव एसएमएसद्वारे मिळते. नाव यादीत नसेल तर ‘No Record Found’ असा संदेश येतो.
याशिवाय voters.eci.gov.in या संकेतस्थळावरूनही नाव शोधण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. ‘Search Your Name in Voter List’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर EPIC नंबर, वैयक्तिक माहिती किंवा मोबाईल नंबरद्वारे नाव शोधण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. ‘Search by Details’ निवडल्यास राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, वय आणि लिंग अशी माहिती अचूक भरावी लागते.
सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्चा कोड टाकून ‘Search’ वर क्लिक केल्यास मतदाराचा तपशील समोर येतो. ‘View Details’ वर क्लिक करून मतदान केंद्राची सविस्तर माहिती पाहता येते. यामध्ये मतदान केंद्राचा पत्ता, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक दिलेला असतो. हीच माहिती मतदानाच्या दिवशी अत्यंत उपयुक्त ठरते.
या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदार माहितीची स्लिप डाऊनलोड करणे. ‘Print Voter Information’ या बटनावर क्लिक करून पीडीएफ स्वरूपातील स्लिप डाऊनलोड करता येते. ही स्लिप प्रिंट करून मतदानाच्या दिवशी सोबत ठेवल्यास मतदान केंद्र शोधणे आणि ओळख पटवणे अधिक सोपे होते. मात्र लक्षात ठेवावे, ही स्लिप एकटी पुरेशी नसून फोटो असलेले ओळखपत्र आवश्यक आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा - भाऊसाहेब...

तेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेध

माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन ;...